|| विजय पाटील

कोयना जलग्रहण क्षेत्रात मुसळधार पावसाचा जोर कायम असल्याने धरणातील जलसाठा ९० टक्क्य़ांवर गेला आहे. यामुळे खबरदारीचा  उपाय म्हणून शनिवारी धरणाचे सहाही दरवाजे उघडण्यात येऊन त्यातून सतरा हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

कोयना धरणातील पाण्याची आवक ८० हजार क्युसेकवर असल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग आणखी वाढवणे अपरिहार्य राहणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या जनतेला सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. तर, या पाश्र्वभूमीवर आपत्कालीन व्यवस्था आणि प्रशासन सतर्क झाले आहे.

आज दिवसभरात कोयना, वारणा, राधानगरी, दूधगंगा, तारळी, धोम-बलकवडी, टेमघर, मुळशी, मोरणा आदी धरणक्षेत्रात मुसळधार पर्जन्यवृष्टी होत आहे. तर, शाहूवाडी तालुक्यातील निवळे विभागात सर्वाधिक १४९, पाठोपाठ वाई तालुक्यातील जोर येथे १४३, वाळवणला १०७, पाथरपुंजला ११०, प्रतापगडला १०९ मि.मी. असा तुफान पाऊस झाला आहे.

कोयनेच्या पाणलोटामध्ये गेल्या ८-९ दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसाने  जोर धरल्याने धरणसाठा नियंत्रित ठेवताना कृष्णा-कोयना नद्यांकाठी पुराची स्थिती ओढावू नये याची दक्षता घेत धरण प्रशासनाने आज शनिवारी दुपारी १ वाजता धरणाचे ६ वक्र दरवाजे दोन फूट, तर  सायंकाळी पाच वाजता हे दरवाजे ३ फुटांपर्यंत उचलून कोयना नदीपात्रात पायथा वीजगृहासह १९,२२६ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. कोयनेच्या पाणलोटात दिवसभरात १०७.३३ एकूण ३,९५५ मि.मी. (एकूण सरासरीच्या ७९.१० टक्के) पावसाची नोंद आहे. हा पाऊस आजवरच्या सरासरीपेक्षा २० ते २५ टक्क्यांनी अधिक राहिल्याने प्रारंभी तळाशी असलेल्या १०५.२५ टीएमसी कोयना जलाशयात यंदाच्या हंगामात ८० टीएमसी (धरणक्षमतेच्या ७६ टक्के) पाणी जमा झाले आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील वारणा, राधानगरी, कण्हेर, तारळी, उरमोडी, वीर, मुळशी, चासकमान, खडकवासला, पानशेत ही धरणेही शिगोशिग भरून वाहात आहेत. त्यामुळे कृष्णा-कोयना, पंचगंगा, वारणा, भीमा या नद्या पूरसदृशस्थितीत वाहात आहेत. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील अलमट्टी धरणही भरून वाहात असून, या धरणात आवक होणाऱ्या जवळपास सव्वादोन लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे सांगलीचा पुराचा धोका टळतो आहे. परंतु, कृष्णा-कोयना तसेच, वारणा नद्यांच्या पाणीपातळीत आणखी वाढ झाल्यास सांगली शहराला पुराचा फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर या धरणांचा पाणीसाठा २७.६७ टीएमसी (९५ टक्के) असून, टेमघर वगळता अन्य तिन्ही धरणांमधून जलविसर्ग सुरू असल्याने चंद्रभागेच्या पाणीपातळीत चांगलीच वाढ झाली आहे. या पाण्यामुळे सोलापूर जिल्ह्यतील उजनी जलाशय झपाटय़ाने भरतो आहे. गेल्या २४ तासात उजनीचा पाणीसाठा ३.८६ टीएमसीने (७.२१ टक्क्याने) वधारला आहे.

  • पश्चिम महाराष्ट्रातील धरणसाठे टीएमसीमध्ये कंसात, त्याची टक्केवारी- कोयना ९० टीएमसी (८५.५१ टक्के), वारणा ३२.३३ (९५), राधानगरी ८.२९ (९९.१८), दूधगंगा १९.११ (८४.६०), उरमोडी ८.०६ (८१), कण्हेर ९.५५ (९५), धोम ११ (८१.५५), खडकवासला १.९७ (१००), पानशेत १०.६५ (१००), वरसगाव १२ (९३.५०), टेमघर ३.०६ (८२.५३), चासकमान ७.५५ (१००), मुळशी १७.९१ (९७) तर उजनी १९.४२ टीएमसी (३६.२५ टक्के) असा प्रमुख धरणांचा जलसाठा आहे.