मुसळधार पावसाने बुधवारी रात्रीपासून नागपूरसह विदर्भातील इतर काही जिल्ह्यांना झोडपून काढले. पावसामुळे नागपूर शहरातील अनेक रस्त्यांना ओढ्याचे स्वरुप आले असून, ठिकठिकाणी पाणी साचले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पूर्व नागपूरमधील अनेक लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.
बुधवारी रात्रीपासून नागपूर येथे मुसळधार पाऊस सुरू आहे. सकाळी पावसाचा जोर आणखी वाढला. यामुळे नागपूरमधील काही शाळांना सुटी देण्यात आली आहे. त्याचबरोबर नागपूरमधून उड्डाण करणारी आणि नागपूरमध्ये उतरणाऱया विमानांच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे. निम्न वर्धा प्रकल्पाचे १७ दरवाजे ३० सेंटी मीटरने उघडून पाणी सोडण्यात आले असून, त्यामुळे वर्ध्यामधील लोकांना सतर्कतेचा इशारा जिल्हाधिकाऱयांनी दिला आहे.
मुसळधार पावसामुळे नागपूर शहरातील जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत झाले आहे. रस्त्यावर पाण्याचे प्रवाह असल्याने अनेक ठिकाणी दुचाकी बंद पडल्याच्या घटनाही घडल्या आहेत.