पुढील आठवड्यात राज्यातील विविध भागांत विजांच्या गडगडटांसह मुसळधाप पावसाचा अंदाज हवान खात्याने व्यक्त केला आहे. सात ऑक्टोबर ते १२ ऑक्टोबर दरम्यान मराठवाडा, विदर्भ आणि मध्य-महाराष्ट्रातील काही भागात दुपार नंतर ढगाळी हवामानासह वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. नाशिकसह खान्देश आणि औरंगाबाद जिल्ह्यात ८ तारखे पर्यंत काही प्रमाणात आभाळी हवामान आणि मेघ-गर्जनेसकट पावसाची शक्यता आहे, तर नगर, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांत काही भागात १२ तारखेपर्यंत मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता आहे. लातूर, बीड, उस्मानाबाद आणि नांदेड जिल्ह्यांसह उर्वरित मराठवाड्यात हवामानाची ही स्थिती ११ तारखेपर्यंत राहील, तर विदर्भातील चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील काही भागात १२ तारखेपर्यंत काही प्रमाणात ढगाळी हवामान आणि मेघ गर्जनेसकट पाऊस पडेल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

परतीचा प्रवास १० पासून : परतीच्या पावसाची सुरुवात राजस्थानच्या वायव्येला १० ऑक्टोबरपासून होण्याची शक्यता हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. राजस्थानातील पाऊस सध्या ओसरत असून परतीचा पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे. पावसाच्या दीर्घकालीन अनुमानानुसार पुढील आठवडय़ात राज्यात काही ठिकाणी गडगडाटासह पावसाची शक्यता आहे.

तापमान दोन अंशांनी वाढले : मुंबईकडे पावसाने पाठ फिरवली असून रविवारी तापमानात दोन अंशांनी वाढ होऊन पारा ३४.५ अंश सेल्सियस इतका वाढला. त्यामुळे दिवसभर उन्हाचा ताप वाढला. उत्तर भारतात हवामानामध्ये वेगाने बदल होत असून शरदाची चाहूल लागली आहे.

कृषी विभागाचे शेतकर्यांना आवाहन : या कालावधीत शेतकऱ्यांनी दुपारनंतर येणाऱ्या वादळ आणि विजांपासून आपले संरक्षण करावे. वादळ आल्यास झाडांखाली, मोकळ्या जागेत, टिनच्या शेडखाली, वीजप्रवाह असलेल्या तारांखाली किंवा विद्युत रोहित्रांनजीक आसरा घेऊ नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

नाशिकमध्ये पावसाचा धुमाकूळ : सलग दुसऱ्या दिवशी शहरासह जिल्ह्य़ाच्या काही भागांस पावसाने झोडपले. दुपारनंतर सुमारे दोन तास झालेल्या पावसामुळे शहरातील सखल भागातील घरे आणि दुकानांमध्ये पाणी शिरले. पावसामुळे गोदावरीच्या पातळीत वाढ होऊन गोदाकाठ परिसरातील नदीपात्रात असलेली पर्यटकांची काही वाहने पाण्याखाली गेली. गोदावरी-वाघाडी संगमाजवळ अडकलेल्या चार ते पाच जणांची स्थानिक युवकांनी दोरीच्या साहाय्याने सुटका केली.