कोकण किनारपट्टीवर मान्सून सक्रिय झाल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. रायगड जिल्ह्य़ातील बहुतांश भागांत पावसाने दमदार हजेरी लावली आहे. उकाडय़ाने होरपळून निघालेल्या रायगडकरांना हवेत थंडावा निर्माण झाल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. पावसाच्या आगमनाने शेतीच्या कामांनी वेग आला आहे. यंदाच्या कडक उन्हामुळे सर्वच जण हैराण झाले आहेत, त्यामुळे सर्वानाच पावसाच्या आगमनाची प्रतीक्षा आहे. गेल्या काही दिवसांपासून अधूनमधून आकाशात काळ्या ढगांची गर्दी होत होती. परंतु पाऊस काही बरसत नव्हता. ज्या क्षणाची सर्वानाच प्रतीक्षा होती ती शुक्रवारी रात्री संपली. जिल्ह्य़ातील बहुतांश भागांत शुक्रवारी रात्री आणि शनिवारी पहाटे पावसाने दमदार हजेरी लावली. मध्यरात्रीनंतर विजांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस बरसायला लागला. त्यामुळे सखल भागांत पाणी साचण्याच्या घटना घडल्या. अलिबाग, महाड, पोलादपूर, मुरुड, श्रीवर्धन, नागोठणे, खोपोली, पेण या भागांत २ ते ३ तास पावसाच्या सरी कोसळत होत्या.
पावसासोबत आलेल्या वादळी वाऱ्यांमुळे जिल्ह्य़ाच्या अनेक भागांत वीजवाहिन्या तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. पावसाच्या आगमनामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे. शेतीच्या मशागतीच्या कामांना आता वेग आला असून येत्या २ ते ३ दिवसांत भाताच्या पेरण्या पूर्ण होतील अशी अपेक्षा आहे.