मुसळधार पावसाने रायगड जिल्ह्याला झोडपून काढले आहे. अतिवृष्टीमुळे आंबा, सावित्री आणि कुंडलिका नद्यांच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे नागोठणे आणि महाड परिसरात पुरस्थिती निर्माण झाली असून पावसाचा जोर कायम राहिल्यास रोहा शहरालाही पुराचा तडाखा बसण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात सोमवारी सकाळपासूनच बहुतांश भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. दुपारनंतर पावसाचा जोर आणखी वाढल्याने नद्यांच्या पातळीत वाढ होण्यास सुरूवात झाली. आंबा नदीची धोका पातळी ८ मीटर असून संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास नदीने ही धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे नागोठणे परिसराला पुराचा तडाखा बसला आहे. संध्याकाळी सातच्या सुमारास शहरातील सखल भागात पुराचे पाणी शिरण्यास सुरुवात झाली असून पावसाचा जोर कायम राहिला तर परिस्थिती अधिकच बिकट होण्याची शक्यता आहे.

तर महाड परिसरातही पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे सावित्री नदीच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. पावसाचा जोर कायम असल्याने नदीकाठच्या सखल भागांना पुराचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. महाड तालुक्यातील मांघरूण- पंदेरी-दापोली मार्गावर असलेला पूल गेल्या तीन दिवसांपासून पाण्याखाली असल्याने पंदेरी आणि दापोली या दोन गावांचा संपर्क तुटला आहे. या दोन्ही गावांतील नागरिक आणि विद्यार्थी गावातच अडकून पडले आहेत. महाड रायगड मार्गावरील जुना नाते पुलही पाण्याखाली गेला आहे. महाड- दस्तुरी मार्गावर रात्री आठच्या सुमारास पुराचे पाणी शिरण्यास सुरवात झाली आहे. याशिवाय, भिरा धरण परिसरात सुरु असलेल्या संततधार पावसाने कुंडलिका नदी दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे रोहा शहर आणि आसपासच्या परिसरातील गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अतिवृष्टीमुळे रोहा कोलाड मार्गावर वृक्ष कोसळला होता. त्यामुळे जवळपास दोन तास दोन्ही बाजूची वाहतुक बंद होती. दरम्यान जिल्ह्यात येत्या ४८ तासात मुसळधार पावसाची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे नदी आणि डोंगर उतारावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

संध्याकाळी साडेसहा वाजता नद्यांची पातळी

नदी             धोका पातळी        सध्याची पातळी

आंबा                 ८ मीटर                 ८ मीटर

कुंडलिका     २३.९५ मीटर             २३.९० मीटर

सावित्री           ६.५० मीटर            ६ मीटर