अतिवृष्टीमुळे उत्पादन घटले, बाजारात आफ्रिकेचा ‘तिळगुळ घ्या..’

प्रदीप नणंदकर, लोकसत्ता

लातूर :  अतिवृष्टी तसेच अवकाळीचे संकट यंदा तीळ उत्पानावरही कोसळले आहे. या नैसर्गिक संकटामुळे भारतातील तिळाचे उत्पादन आणि गुणवत्ताही घसरली आहे. परिणामी, या वर्षी मकर संक्रमणासाठी लागणाऱ्या तिळगुळातील तीळ थेट आफ्रिकेचा असणार आहे.

डिसेंबरअखेरपासून तिळाची आयात सुरू झाली असून किरकोळ बाजारात त्याचा दर १७० ते १८० रुपये किलोपर्यंत गेला आहे. मध्य प्रदेश व उत्तर प्रदेश या दोन प्रमुख तीळ उत्पादक प्रदेशांना पावसाचा तडाखा बसल्याने बाजारपेठेतील दर वधारले असल्याचे व्यापारी सांगतात.

भारतातील उत्पादित तिळाची यावर्षी गुणवत्ता फारच घसरलेली आहे. पावसाने गुणवत्तेवरच घाला घातल्याने देशांतर्गत तिळाचे भाव कडाडले. चांगल्या गुणवत्तेचा माल केवळ १० ते १५ टक्केच येतो आहे. खरेदी केलेला माल त्याची चांगली प्रतवारी करून बाजारपेठेत विकला जातो. आफ्रिकेतील तीळ २५ डिसेंबरपासून भारतील बाजारपेठेत दाखल झाला आहे. जगभरात तिळाचे काळा, पांढरा व चॉकलेटी अशा तीन रंगाचे प्रकार आहेत. भारतीय बाजारपेठेत पांढऱ्या तिळाची मागणी अधिक असते.

गुजरात प्रांतात उन्हाळी तीळ घेतला जातो. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान व गुजरात हे चार तिळाचे उत्पादन प्रमुखपणे घेणारे प्रांत आहेत. महाराष्ट्र, आंध्र व कर्नाटकात खरीप हंगामात तीळ घेतला जातो, तर तामिळनाडूत रब्बी हंगामात तीळ घेतला जातो. तिळाचा औषधासाठी मोठा वापर होतो. शिवाय खाद्यान्नामध्ये काजूला पर्याय म्हणून टरबुजाचा मगस व तिळाची पावडर वापरली जाते. त्यामुळे तिळाची बाजारपेठेतील मागणी मोठी आहे.

*   पाच-सहा वर्षांपूर्वी जगात तीळ उत्पादनात भारताचा क्रमांक पहिला होता. मात्र, हवामान बदलाचा फटका शेती क्षेत्राला बसत असल्याने पेरा व उत्पादनात घट होत असून आता तीळ उत्पादक देशांमध्ये आफ्रिकेचा क्रमांक जगात पहिल्या क्रमांकावर आला आहे.

*   चीन व व्हिएतनाम या दोन देशांत तिळाचा वापर अधिक होतो. अमेरिका, जपान, रशिया अशा प्रत्येक देशात कमी-अधिक प्रमाणात तिळाचा वापर केला जातो.

*   भारतात संक्रांतीच्या सणाच्या निमित्ताने घरात लागणाऱ्या वर्षभरासाठीची तिळाची खरेदी केली जाते. हलवा, लाडू, तिळपापडी, रेवडय़ा असे तिळाचे पदार्थ तयार केले जातात.

*   हिवाळ्यात कोरडय़ा पडत जाणाऱ्या त्वचेला तिळातील स्निग्धता हितकारक असल्याने या दिवसात तिळाचा वापर अधिक केला जातो. भारतात संक्रांतीच्या सणाच्या निमित्ताने सुमारे ७५ हजार टन तिळाची उलाढाल होत असल्याची माहिती लातूर येथील व्यापारी आशीष अग्रवाल यांनी दिली.