सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात अतिवृष्टीमुळे ३०० हेक्टर भातशेती आणि फळझाड लागवडीतील ९०० हेक्टर सुपारीचे क्षेत्र बाधित झाल्याचा अंदाज कृषी विभागाचा आहे. शासनस्तरावर सर्वेक्षण करून अहवाल पाठवला जाणार आहे. मात्र जिल्ह्य़ात अधूनमधून पाऊस सध्या कोसळला नाही तर लष्करी अळी, निळे भुंगेरे, करपाचा प्रादुर्भाव भातपिकावर होऊ शकतो असे कृषी विभागाचे म्हणणे आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात सन २०१२ मध्ये भातशेती लागवडीखाली ७४ हजार हेक्टर क्षेत्र होते. त्यात घट होऊन हे क्षेत्र ६० हजार २३८ हजार हेक्टरवर आले आहे. कृषी विभागाने १४ हजार हेक्टर क्षेत्राची घट भरून काढण्याचा प्रयत्न केल्याचा दावा केला आहे.

जिल्ह्य़ात १४ हजार हेक्टर क्षेत्र भातशेती लागवडीखाली घटले असले तरी त्यातील ५०० हेक्टरवर भाजीपाला जिल्ह्य़ातील शेतकरी पिकवतात असे कृषी विभागाने म्हटले आहे. ही आकडेवारी पकडली तरीसुद्धा १२ हजार हेक्टर क्षेत्रावर शेतकरी भात लागवड करत नसल्याचे चित्र आहे.

भातशेतीसाठी कामगार, महिला कामगार मिळत नाही अनेक ठिकाणी बैलांचे जोत नांगरणीसाठी एका दिवसाला ५०० रुपये घेतले जातात, तसेच कामगाराचा दिवसाचा पगार जेवण घालून किमान ३०० रुपये आहे. हा खर्च आणि निसर्गाची साथच मिळाली नाही तर भातशेतीचे होणारे नुकसान पाहता भातशेती लागवडीखालील जमीन पडीक ठेवली जात असल्याने कृषी विभागाचे म्हणणे आहे. जिल्ह्य़ात गतवर्षी १८०० हेक्टरवर नाचणी पीक घेण्यात आले होते. यंदा हे क्षेत्र १४०० हेक्टरवर आले. म्हणजे नाचणी पीकदेखील घटले आहे. भुईमूग लागवडदेखील शेतकऱ्यांनी केली आहे. यंदा जिल्ह्य़ात शेतीच्या बांधावर ६०० हेक्टर क्षेत्रावर तूर लागवडीचे क्षेत्र आले आहे.

जिल्ह्य़ातील भात शेतीसह नागली पिकांचे क्षेत्र घटत आहे. नवीन पीक घेण्यासाठी हे क्षेत्र घटत नसून मजुरांची वानवा हे प्रमुख कारण असून शेतीचे उत्पादन आणि खर्चाचा ताळमेळ घालणे अनेक शेतकऱ्यांना अवघड होऊन बसले आहे.

जिल्ह्य़ात सतत अतिवृष्टी झाल्यामुळे भातशेतीच्या वाफ्यात पाणी साठून राहिले. त्यामुळे ३०० हेक्टर भातपीक खराब झाले. फळझाड लागवडीत सुपारीच्या फळाची घळ झाली. हे क्षेत्र नऊशे हेक्टर आहे असे कृषी विभागाचे म्हणणे आहे. भात व सुपारी क्षेत्राचे सर्वेक्षण सुरू झाले असून भात क्षेत्राचे पंचनामे झाल्याचे सांगण्यात आले.