तीव्र दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या महाराष्ट्राला शुक्रवारी मुसळधार पावसाने मोठा दिलासा दिला. पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्हे, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात सर्वदूर जोरदार पाऊस पडत असून त्यामुळे बळीराजा सुखावला आहे. विघ्नहर्त्या गणरायाचे गुरुवारी आगमन झाले आणि त्याने भक्तांवरील दुष्काळाचे विघ्न दूर करण्यास सुरूवात केल्याचे पाहायला मिळाले. आणखी दोन दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहिल, असा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे.
दरम्यान, वाशिम जिल्ह्यातल्या धोरखेडा गावात चक्रीवादळाने थैमान घातले. अचानक आलेल्या चक्रीवादळामुळे धोरखेडा गावात अनेक ठिकाणी पडझड झाली असून यात पाच जण जखमी झालेत तर अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत.
पुणे, औरंगाबाद, नाशिक, परभणी, बीड, जळगाव, अकोला, अमरावती, वर्धासह इतरही ठिकाणी पावसाची संततधार सुरू आहे. मराठवाड्यात गुरुवारी रात्रीपासून पाऊस पडतो आहे. या पावसामुळे दुष्काळग्रस्त भागातील जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. शेततळ्यांमध्ये आणि कालव्यांमध्ये पाणी वाहू लागले आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी धबधबेही जिवंत झाले आहेत. वेरूळ लेण्याजवळील धबधबेही वाहू लागले आहेत. त्यामुळे अनेक पर्यटकांनी तिकडे गर्दी केली आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, जालना, परभणी या जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक आहे. तुलनेत लातूर, उस्मानाबादमध्ये पावसाचा जोर कमी आहे. औरंगाबादमध्ये गेल्या २४ तासांत ८४ मिमी पाऊस पडला असून, तेथे अजूनही पावसाचा जोर कायम आहे.
पुणे शहरातही सकाळपासून पावसाचा सरी कोसळत आहेत. पुण्याला पाणीपुरवठा करणाऱया खडकवासला प्रकल्पातील चार धरणांमध्येही पावसाला सुरूवात झाली आहे. दुपारी बारा वाजेपर्यंत खडकवासला धरणात ४१ मिमी, पानशेतमध्ये ६६ मिमी, वरसगावमध्ये ६४ मिमी आणि टेमघर धरणामध्ये ३९ मिमी पाऊस झाला आहे. संततधार पावसामुळे धरणांतील पाणीसाठ्यात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. पुणे शहरातही पावसाचा जोर आहे. अनेक रस्त्यावर पाणी साठले असून, त्यातूनच वाहनचालकांना आणि सर्वसामान्य नागरिकांना मार्ग काढत पुढे जावे लागते आहे.
विदर्भातही पावसाचा जोर कायम आहे. चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, यवतमाळ जिल्ह्यांमध्ये पावसाची संततधार पडते आहे. चंद्रपूरमधील महत्त्वाचे इराई धरणांतील पाणीसाठ्यात वाढ झाल्यामुळे या धरणाचे तीन दरवाजे उघडण्यात आले आहेत. अन्य ठिकाणीही नद्या, नाले दुथडी भरून वाहताहेत. काही ठिकाणी अतिवृष्टी झाल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील पाणी पुरवठ्यासाठी महत्त्वाचे असणारे येळगाव धरण भरले आहे.
उत्तर महाराष्ट्रात नाशिक, जळगाव, धुळे, नंदूरबारमध्येही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पावसामुळे कुंभमेळ्यातील तिस-या शाहीस्नानाला उशीरा सुरुवात झाली. सिन्नर येथे ८८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
दुष्काळग्रस्त सोलापूरमध्ये पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे बळीराजा आनंदित झाला असून, नागरिकही सुखावले आहेत. पुणे ते सोलापूर दरम्यानच्या पालखी मार्गावरील गावांमध्येही पाऊस पडतो आहे.