केरळमध्ये पुराचा हाहाकार माजला असताना महाराष्ट्रातल्या नंदुरबारमध्येही पुराच्या पाण्यामुळे ५ जणांचा मृत्यू झाला. नंदुरबारच्या नवापूर तालुक्यात मुसळधार पाऊस आणि त्यानंतर आलेल्या पुरामुळे ही घटना घडली.५ पैकी ४ जणांची ओळख पटली असून एकाची ओळख पटणे बाकी आहे. या पुरामुळे शेकडो घरांचे नुकसान झाले आहे. पिकांची आणि पशू धनाचीही मोठी हानी झाली आहे. या ठिकाणी युद्ध पातळीवर मदत कार्य सुरू करण्यात आले आहे.

शुक्रवारी पहाटेपासूनच नंदुरबार येथील नवापूर तालुक्यात मुसळधार पाऊस सुरु झाला. या पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला. बिसरवाडी जवळच्या सरपणी नदीच्या बालाहाट गावाजवळ जामानाबाई लाश्या गावित या ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला तर तिचा पती झाडाला लटकल्याने तो वाचला आहे अशीही माहिती समोर आली आहे. नवापूर शहरातून वाहणाऱ्या रगावली नदीलाही महापूर आला. नदीने धोक्याची पातळी ओलांडली. ज्यामुळे नदी काठावर असलेल्या अनेक घरांमध्ये पाणी शिरले आणि नुकसान झाले.

या पुराच्या पाण्यामुळे अनेक गावांमधील बंधारे, पूल वाहून गेले आहेत. अनेक भागांमध्ये रस्तेही धसले आहेत. एकाच रात्रीतून १४० मिमी पावसाची नोंद झाल्याने या ठिकाणी पावसाचे रौद्ररूपच पाहायला मिळाले आहे. रगावली नदीत काही लोक अडकले होते ज्यांची सुटका करण्यात यश आले आहे. सुरत अमरावती राष्ट्रीय महामार्गावर पाणाबारा येथील पर्यायी पूल खचल्याने महामार्गावरची वाहतूक सकाळपर्यंत रोखण्या आली होती. तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर ही वाहतूक विसरवाडी गावातून नंदुरबारमार्गेव वळवण्यात आली.