मुसळधार पावसाने रायगड जिल्ह्याला झोडपून काढले आहे. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील सावित्री, अंबा, कुंडलिका, पाताळगंगा नद्यांनी धोका पातळी ओलांडली आहे. त्यामुळे महाड आणि नागोठणे परिसरात पुरस्थिती निर्माण झाली आहे. रोहा खिंड आणि ताम्हणी घाटात दरडी कोसळल्याने रस्ते वाहतूक विस्कळीत झाली आहे. जिल्ह्यात पावसाचा जोर अजूनही कायम आहे.
बुधवारी सकाळी आठ वाजेपर्यंत संपलेल्या २४ तासात जिल्ह्यात सरासरी १७७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. खालापूर येथे २६८ मिमी, माणगाव येथे २६० मिमी, रोहा येथे २५७ मिमी,माथेरान येथे २५४ मिमी, उरण येथे २३० मिमी, मुरुड येथे १८५ मिमी, म्हसळा येथे १८० मिमी, तळा येथे १७५ मिमी, कर्जत येथे १५५, सुधागड १४२, श्रीवर्धन १४०, पनवेल १४०, पेण १३५, अलिबाग ११७, पोलादपूर येथे ११४, तर महाड येथे ९१ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील सर्व नद्या दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे नदी किनाऱ्यांवरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. अंबा, सावित्री नद्यांनी बुधवारी सकाळी धोका पातळी ओलांडली, त्यामुळे नागोठणे आण महाड परिसरातील सखल भागात पूरस्थिती निर्माण झाली. पाताळगंगा नदीने धोकापातळी ओलांडल्याने सावरोली येथील पूल पाण्याखाली गेला, त्यामुळे खालापूर कडे जाणारी वाहतूक काही काळ थांबविण्यात आली. अंबा नदीने धोकापातळी ओलांडल्याने वाकण पाली मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली. जांभूळपाडा पुल पाण्याखाली गेल्याने तेथील वाहतूक थांबविण्यात आली. मोर्बा पूलावरून पुराचे पाणी गेल्याने माणगाव श्रीवर्धन वाहतूक थोपविण्यात आली.
रोहा खिंडीत दरड कोसळल्याने नागोठणे रोहा दरम्यानची वाहतूक बंद झाली. ताम्हणी घाटात दरड कोसळल्याने माणगाव पुणे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. भोर घाटही बंद असल्याने दक्षिण रायगडमधून पुण्याला जोडणारे दोन्ही मार्ग बंद झाले. मरुड रोहा मार्गावर झाड पडल्याने वाहतूक विस्कळीत आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 4, 2019 11:32 am