28 September 2020

News Flash

पालघर जिल्ह्याला पावसाचा तडाखा

किनारपट्टी भागाला जोरदार तडाखा; जनजीवन विस्कळीत

किनारपट्टी भागाला जोरदार तडाखा; जनजीवन विस्कळीत

पालघर : गेल्या १५ दिवसांपासून अचानकपणे पाऊस गायब झाल्याने शेतकरी वर्ग संकटात सापडला होता. मात्र, मंगळवार पहाटेपासून जिल्ह्यात किनारपट्टीच्या भागात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला. तर काही ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या आहेत.  मुसळधार पावसामुळे किनारपट्टीच्या तालुक्यांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले.

गेल्या २४ तासांत  वसई तालुक्यात १०२ मिलिमीटर, पालघर तालुक्यात ५९ मिलिमीटर, डहाणू तालुक्यात ४६ तर वाडा व विक्रमगड तालुक्यात प्रत्येकी सुमारे ३३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्याच्या डोंगराळ भागात मध्यम स्वरूपात पाऊस झाल्याची माहिती पुढे आली.

वीजपुरवठा काही तासांसाठी विस्कळीत

सोसाटय़ाचा वारा आणि मुसळधार पावसामुळे मंगळवारी पालघरमध्ये ५५ ठिकाणी वीजवाहिन्यांमध्ये तांत्रिक बिघाड झाले. यामुळे २ लाख ४९ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला. अनेक ठिकाणी वीजवाहिन्यांवर झाडे उन्मळून पडून लघुदाब वीजवाहिनीच्या १६ विजेच्या खांबांचे नुकसान झाले. ५५ वीजवाहिन्यांपैकी २७ वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा काही तासांनंतर सुरळीत झाला. पावसामुळे कामे करण्यात अडचणी येत असल्याचे महावितरणच्या वतीने सांगण्यात आले.

बोईसरमध्ये रस्ते जलमय

किनारपट्टी भागात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून रस्त्यावर पाणी साचले आहे. पावसाळ्यापूर्वी शहरी भागात नालेसफाई झाली नसल्याने बोईसर भागातही अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. बोईसर शहराबरोबरच सरावली, तारापूर औद्योगिक क्षेत्र भागात मोठय़ा प्रमाणात पाणी साचले होते. येथील सरावली-पालघर रस्ता पाण्याखाली गेला होता. त्याचप्रमाणे औद्योगिक क्षेत्रात पाणी साचले होते.

डहाणू, तलासरीलाही झोडपले

मुसळधार पावसाने डहाणू, तलासरीला अक्षरश: झोडपले. मुसळधार पावसामुळे लोकांनी घराबाहेर न पडता घरीच राहणे पसंत केले. डहाणू शहरात दिवादांडी, डहाणू गाव, सतीपाडा, घाचीया या भागांत घरांत पाणी शिरले. दिवादांडी परिसरात रस्त्यावर गुडघाभर पाणी वाहू लागले आहे. त्यामुळे रहिवाशांना रस्ता ओलांडणे मुश्कील झाले आहे. उधाणाचे पाणी वाढू लागल्याने डहाणू खाडीमार्गे गावात पाणी शिरण्याची भीती मच्छीमारांकडून व्यक्त होत आहे.

लोकमान्य पाडा पाण्याखाली

मुसळधार पावसामुळे नगर परिषद हद्दीतील लोकमान्य पाडा आणि गोठणपूर सफाई कर्मचारी वसाहतीतील कर्मचारी निराश झाले. पावसामुळे लोकमान्य पाडा परिसर संपूर्ण पाण्याखाली गेला. याचबरोबरीने सफाई कर्मचारी वसाहतही पाण्याखाली गेल्याने हाल झाल्याचे स्थानिकांनी सांगितले. लोकमान्य पाडा येथे  पाणी निचरा व्यवस्थापनासाठी गटार प्रस्तावित आहे, असे पालघरच्या नगराध्यक्ष डॉ. उज्ज्वला काळे यांनी सांगितले.

जिल्ह्य़ातील २८१ बोटी समुद्रात

पालघर : १ ऑगस्टपासून मासेमारी हंगाम सुरू झाले असून जिल्ह्य़ातील २८१ बोटी मासेमारीसाठी रवाना झाल्या आहेत. बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ामुळे कोकणपट्टी व समुद्रामध्ये मुसळधार पाऊस सुरू झाला असून या बोटींना खराब हवामानाचा सामना करावा लागत आहे. सातपाटी मुरबे येथील २३८, वसई तालुक्यातील २७ व डहाणू तालुक्यातील सहा बोटी १ व २ ऑगस्टला मासेमारीसाठी रवाना झाल्या. हवामान विभागाकडून खराब हवामानाविषयी किंवा मुसळधार पावसाविषयी कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना नसल्याने या बोटींना सूचित केले नव्हते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 5, 2020 1:57 am

Web Title: heavy rains disrupted life in coastal talukas of palghar zws 70
Next Stories
1 अनुदानित युरियाचा काळाबाजार
2 शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना नभोवाणी, दूरचित्रवाणीचा आधार
3 गावी पाठवत नसल्याने युवतीची आत्महत्या
Just Now!
X