मराठवाड्यामध्ये पावसाची धुवांधार सुरुच असून गावांचा संपर्क तुटल्यानंतर आता नांदेड आणि लातूर या दोन जिल्ह्यांचा संपर्क ही तुटला आहे. दोन जिल्हांना जोडणाऱ्या मांजरा नदीच्या पूलावरुन पाणी वाहत असून अनेक किलोमीटर वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत. परिणामी नांदेडहून पुणे, मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. दरम्यान दुपारपासुन पूरामध्ये अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक नांदेड आणि लातूरमध्ये दाखल झाले आहे. मराठवाड्यावरील परिस्थितीकडे सरकारचे लक्ष असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बचाव कार्याला सुरुवात झाल्याची माहिती ट्विटवरुन दिली.

राज्यभरात परतीच्या पावसाचा जोर वाढला असून मराठवाड्यातील लातूर, नांदेड आणि बीड या जिल्ह्याला पावसाने अक्षरश: झोडपून काढले.नांदेडमधील लिंबोटी धरणाने धोक्याची पातळी ओलांडली असून, लिंबोटी धरणाचे १५ पैकी १४ दरवाजे उघडले आहेत. प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

मुसळधार पावसामुळे पुरस्थिती निर्माण झाली असून लातूर आणि नांदेड जिल्ह्यातील विविध भागात तब्बल २०० जण पुरात अडकले आहेत. पुरात अडकलेल्या नागरिकांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी कर्नाटकमधून दोन हेलिकॉप्टर बोलाविण्यात आली आहेत. तर नागरिकांच्या मदतीसाठी पुण्याहून राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक (एनडीआरएफ) मराठवाड्यात दाखल झाले आहे. नांदेडमधील डोंगरगावात १३, मावळगाव १० आणि केलूजमध्ये ७ जण अडकले असून लातूरमधील जळकोट तालुक्यातील भेडासांगवी गावात सर्वाधिक १५० लोक अडकले आहेत. पुढील २४ तासात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
सुरवातीला मराठवाड्याला सुखकर वाटणारा पाऊस परतीच्यावेळी नागरिकांना नकोसा वाटू लागला आहे. तीन जिल्ह्यातील लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.