विद्युत खांब तसेच झाडे उन्मळून पडण्याच्या घटना

पालघर : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मंगळवारी झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी विद्युत खांब पडल्याचे तसेच विद्युत वाहिन्यांवर झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित झाला होता.

दुपारी दोन वाजल्यापासून सुमारे एक-दीड तास जिल्ह्यात विविध विकास ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. यामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा करणारे खांब पडल्याचे प्रकार घडले तर काही ठिकाणी विद्युत वाहिनीवर झाडे पडण्याचे प्रकार घडले.

पालघर वळण नाकाजवळील उपकेंद्राकडे येणाऱ्या लाइनवर अयप्पा मंदिरसमोर खांब पडल्याने शिरगाव, सातपाटी, माहीम, धनसार व टेंभोडे भागातील ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. त्याचप्रमाणे डहाणू तालुक्यात कोसबाड भागात तांत्रिक बिघाड होऊन बोर्डी उपकेंद्रअंतर्गत तेरा गावांतील १२ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला. डहाणू विभागात आशागड फिडरवरदेखील तांत्रिक बिघाड होऊन पाच गावांतील वीजपुरवठा बंद राहिला होता. विक्रमगड तालुक्यात अलोंडे फिडरवर तांत्रिक बिघाड होऊन ४० गावांतील वीजपुरवठय़ावर परिणाम झाला तर बोईसरजवळील दांडी फिडरवरील उच्च दाब वाहिनीवरील खांब पडल्याने दांडी, उच्छेळी, उनभाट आदी भागांत वीज गेली होती. मनोरजवळील सावरखंड उपकेंद्रात ढेकाळे येथील वाहिनीवर तांत्रिक बिघाड झाल्याचे महावितरणने कळवले आहे. तसेच जव्हार येथे जाणाऱ्या विद्युत वाहिनीवर वेती गावाजवळ आंब्याचे झाड पडल्याने विरोधात वीजपुरवठा खंडित राहण्याचा प्रकार घडला होता.

खंडित वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरणचे अधिकारी-कर्मचारी तत्परतेने कार्यरत झाले असल्याचे दिसून आले. गेल्या काही दिवसांपासून या भागात मुसळधार पाऊस सुरू असल्याने वीजपुरवठय़ावर अनेक ठिकाणी परिणाम झाल्याचे दिसून आले.