राज्यातील अनेक भागात काल रात्री आणि आज सकाळपासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने ही पावसाची स्थिती निर्माण झाल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात येत आहे. मात्र, या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. यामुळे पिकांचे नुकसान होण्याचा धोका वर्तवण्यात येत आहे.

कोकणासह, पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरली लावली आहे. यामध्ये सोलापूर, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांचा समावेश आहे. सांगली जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. खानापूर, आटपाडी तालुक्यांत रात्री जोरदार पाऊस झाला. त्याचबरोबर पंढरपूरातही जोरदार पावसाने हजेरी लावल्याने कार्तिकी सोहळ्यानिमित्त आलेल्या वारकऱ्यांची तारांबळ उडाली. कोल्हापूर जिल्ह्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली. शिरोळमधील गणेशवाडीसह सीमाभागात भागात जोरदार पाऊस बरसला.

रविवारी रात्री उशीरा दुष्काळी भागात पावसाने दमदार हजेरी लावल्याने पाण्याचा प्रश्न काही अंशी सुटण्याची शक्यता आहे. मात्र, या अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

दरम्यान, कोकणातही जोरदार पाऊस झाला असून सिंधुदूर्गात ढगांच्या गडगडाटांसह मुसळधार पावसाने हजेरी लावली. मालवण, कुडाळ, वेंगुर्ले, कणकवलीत या भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. अरबी समुद्रात कमी दाबाच्या पट्यामुळे राज्यात अनेक भागात ही पावसाची स्थिती पहायला मिळली.