सहा तास मुसळधार पाऊस; झाडे, घरे कोसळली, इंटरनेट यंत्रणा विस्कळीत

पालघर : अरबी समुद्रात घोंगावणाऱ्या तौक्ते चक्रीवादळाचा फटका पालघर जिल्ह्यातील किनारपट्टी परिसराला बसला. रविवार रात्रीपासून तुफानी वाऱ्यासह पावसाने जिल्ह्यात अनेक ठिकाणांना झोडपून काढले. सोमवारी  सहा ते सात तास मुसळधार पाऊस पडला. या चक्रीवादळात कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नसली तरी ३० पेक्षा अधिक घरे, अनेक विद्युत खांब  व झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या आहेत.  फळे-भाजीपाला लागवड तसेच उन्हाळी भात पिके उद््ध्वस्त झाली आहेत.

रविवारी सायंकाळी जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पावसाच्या सरी झाल्या. सोमवारी पहाटेपासून पावसाने दमदार हजेरी लावली व कमी-अधिक प्रमाणात दिवसभर वादळी वाऱ्यांसह पाऊस सुरू राहिला. दुपारी १२ ते सायंकाळी चार वाजेदरम्यान जिल्ह्यातील अनेक भागांनी मुसळधार पावसाचा अनुभव घेतला. या दरम्यान अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले, मात्र कुठेही मालमत्तेचे नुकसान झाल्याची माहिती प्राप्त झाली नाही. सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास समुद्राला भरती आल्याने काही किनारपट्टीच्या गावांमध्ये  पाणी शिरले.

जिल्ह्यामध्ये आंबा व चिकू या फळांना चक्रीवादळाचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. झाडावरील फळे गळून पडली. शेतामध्ये असलेल्या भाजीपाल्याचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जिल्ह्यातील सर्व मासेमारी बोटी रविवारी सुखरूप बंदरात पोहोचल्या होत्या.

जिल्ह्यातील लसीकरण मोहीम सोमवारी बंद ठेवण्यात आली होती तसेच नागरिकाने कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले होते. जिल्ह्यात कोणत्याही भागातील नागरिकांचे स्थलांतर करावे लागले नसले तरी किनारपट्टीच्या भागांमधील नागरिक वादळी वारा दिवसभर सुरू राहिल्याने नागरिक भीतीपोटी आपला जीव मुठीत घेऊन राहिले होते. पालघर तालुक्यात २०० मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला. अनेक भागात विद्युत प्रवाह खंडित  होता तर मोबाइल नेटवर्कची समस्या भेडसावत होती. अनेक ठिकाणी घरांचे बांधकाम, घरांची दुरुस्ती व मान्सूनपूर्व तयारी सुरू असल्याने अचानक आलेल्या चक्रीवादळ व पावसामुळे नागरिकांचे हाल झाले. पालघर-बोईसर दरम्यान रस्त्याच्या काँक्रीटीकरण  कामावरही पावसाचा परिणाम झाला.  या मार्गावर  वाहतूक कोंडी होऊन बऱ्याच काळासाठी वाहतूक ठप्प राहिली.