कोकणात दोन दिवसांपासून सतत मुसळधार पाऊस सुरु असल्याने इथल्या नद्यांना पूर आले असून अनेक पुलांवरुन पाणी वाहू लागले आहे. त्यामुळे मंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीत थोडासा बदल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयातून ही माहिती देण्यात आली.

पोलिसांच्या माहितीनुसार, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील माणगाव शहराच्या अलीकडे घोड नदीवरील कळमजे पुलावरून पुराचे पाणी वाहू लागले आहे. त्यामुळे महामार्गावरील वाहतुक तात्पुरत्या स्वरूपात बंद करून ती कोलाड नाक्याच्या पुढे भिरा नाका येथून वळवण्यात आली आहे. ही वळवलेली वाहतुक माणगाव एसटी स्टँड समोर निजामपूर नाका येथे पुन्हा मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर येऊन तिथून पुढे वाहतुक नेहमीप्रमाणे सुरू ठेवण्यात आली आहे.

त्याचप्रमाणे मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक देखील माणगाव येथील निजामपूर नाका येथून वळविण्यात आलेली आहे. पावसाची स्थिती पाहून परिस्थितीनुसार पुढील बदल करण्यात येतील, असे पोलीस अधीक्षक कार्यालयातील जनसंपर्क अधिकाऱ्यांनी कळवले आहे.