गेल्या दोन दिवसांत तीन मृत्यू; आंबा, द्राक्ष, काजू, फळपिकांना धोका

मराठवाडा आणि कोकणासह राज्याच्या विविध भागांत मंगळवारी वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने उन्हाच्या काहिलीने त्रासलेल्या नागरिकांना सुखद गारवा अनुभवता आला असला, तरी आंबा, द्राक्ष, काजू आणि फळ पिकांना धोका निर्माण झाल्याने शेतकऱ्यांच्या मनात धडकी भरली आहे. गेल्या दोन दिवसांत वीज पडून तिघांचा मृत्यू झाला आहे, तर नऊजण जखमी झाले आहेत. मराठवाडय़ात लहान-मोठी २२ जनावरेही दगावली आहेत.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील उकाडय़ाचे प्रमाण वाढल्याने नागरिक त्रस्त झाले होते. मंगळवारी कडक उन्हामुळे जिवाची घालमेल झाली होती. दुपापर्यंत उन्हाच्या झळांनी नागरिक हैराण झाले असताना पुण्यात चारनंतर आभाळ भरून आले. ढगांचा गडगडाट होण्यास सुरुवात झाली आणि पावसाने हजेरी लावली.

पुणे शहरासह जिल्ह्य़ामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार सरी कोसळल्या. लवासा परिसरात गारपीटही झाली. ढगांच्या गडगडाटामध्ये साडेचारच्या सुमारास पावसाने िपपरी-चिंचवड शहर आणि परिसरात हजेरी लावली. पावसामुळे वाहनचालकांची तारांबळ उडाली होती. लोणावळ्यात मंगळवारी तापमानाचा पारा ३६ अंशांवर गेला होता. दुपारनंतर काही वेळातच पावसाने जोरदार हजेरी लावली. नागरिक तसेच दुचाकी वाहनचालक जागा मिळेल तेथे (पान महाप्रदेश)

चंद्रपुरात ४४.६ अंश सेल्सिअस तापमान

चंद्रपूर शहरात आज राज्यात सर्वाधिक ४४.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद घेण्यात आली आहे. यावर्षीच्या उन्हाळय़ातील हे सर्वाधिक तापमान असून मे महिन्यापर्यंत चांगलाच उन्हाळा तापण्याचे संकेत आहेत. यावर्षी मार्च महिना व त्यानंतर एप्रिल काहीसा ढगाळ वातावरणात आणि सायंकाळच्या वेळी होणाऱ्या पावसांच्या हलक्या सरींमध्ये गेल्याने उन्हाळय़ाच्या तीव्रतेची जाणीव झाली नाही. मात्र काल सोमवारपासून चंद्रपूर शहरात कडक उन्हाळा तापायला सुरुवात झाली आहे. काल सोमवारी चंद्रपुरात ४३.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद घेण्यात आली. नंतर एका दिवसात प्रचंड वाढ  झाली असून आज मंगळवारी ४४.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद घेण्यात आली आहे. यावर्षीच्या उन्हाळय़ातील हे आतापर्यंतचे सर्वाधिक तापमान आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे रस्ते ओस पडले आहेत. बाजारपेठा ठप्प झाल्या आहेत. चंद्रपुर पाठोपाठ वर्धा ४४.१, नागपूर ४३.२, अमरावती ४३, यवतमाळ ४२.५, वाशीम ४१.६, गडचिरोली ४२, ब्रम्हपुरी ४२, गोंदिया ४०.८, बुलढाणा ३९  अंश सेल्सिअस तापमानाची नोंद घेण्यात आली.

आजही जोरदार सरी?

दक्षिण-मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात काही ठिकाणी बुधवारी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे.

ऊसाला वरदान?

या पावसामुळे आंबे, द्राक्षे या फळ पिकांचे मोठे नुकसान होण्यांची शक्यता आहे. मात्र, ऊस पिकांसाठी हा पाऊस वरदान ठरेल, असे शेतकऱ्यांनी सांगितले.