सातारा तालुक्यासह महाबळेश्वर, पाचगणी, वाई, जावली, कराड परिसरात आज(शनिवार) सायंकाळपासून मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. बोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मांडवे (ता.सातारा) गावात मात्र ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसून आले. अचानक झालेल्या या मुसळधार पावसामुळे या परिसरातील ओढ्या नाल्यांना पूर आल्याने सर्व विहरी भरून वाहून लागल्या. गावात सर्व मार्गांवर पाणी वाहत असल्याचं एकंदरीत चित्र पाहायला मिळालं. यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचेही वातावरण निर्माण झाले आहे.

सातारा शहराबरोबर महाबळेश्वर, पाचगणी, वाई या भागात मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावली. ओढ्यालगत असलेल्या रस्त्यावरून जाणारी एक वयोवृद्ध महिला देखील ओढ्यात वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे.

या घटनेची माहिती मिळताच बोरगाव ( ता.सातारा) पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ हे घटनास्थळी पोहचले व ग्रामस्थांच्या मदतीने त्यांनी स्वतः या महिलेचा शोध घेण्यास सुरुवात केली. रात्री उशिरापर्यंत या महिलेचा शोध घेण्याचे काम सुरू होते, मात्र महिला आढळली नाही.

एका बाजूला मांडवेमध्ये अशी परिस्थिती झाली असताना दुसरीकडे खटाव तालुक्यातील वर्धनगड भागातही ढगफुटी सदृश परिस्थिती निर्माण झाली. यामुळे घाट माथ्यावरती असलेल्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने पूर्णपणे वाहतूक थांबवण्यात आली होती. नदीला पूर दिसावा तशी परिस्थिती या घाटाच्या परिसरामध्ये झाली होती. या पावसात अनेकांच्या घरांचे मोठे नुकसान झालेला आहे.

मागील काही दिवसांपासून कास पठार, महाबळेश्वर, पाचगणी, वाई, जावली परिसरात दररोज मुसळधार पाऊस सुरू आहे. मान्सून पाऊस सुरू व्हायला अवकाश असला तरी मागील काही दिवसांपासून सुरू असणाऱ्या पावसामुळे मान्सून सदृश्य पावसाळी वातावरण तयार झाले आहे अनेक भागातील ओढे, नाले भरून वाहत आहेत.