‘निसर्ग‘ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर समुद्र किनाऱ्यावरील वेंगुर्ला, मालवण व देवगड तालुक्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात पडलेल्या मुसळधार पावसाने समुद्राच्या पाण्याची पातळी वाढली आहे. तसेच चक्रीवादळामुळे  ठिकठिकाणी झाडे पडून मोठय़ा प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील आठही तालुक्यात दि. १ ते ३ जून या कालावधीत सरासरी ११६.४५(एकुण ९३१.६) मिमी पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे जलसंपदा प्रकल्प, विहिरींच्या पाण्याची पातळी वाढली आहे. अरबी समुद्रात चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ामुळे सिंधुदुर्ग जिल्’ात मंगळवारपासून पावसाने जोरदार हजेरी लावली. बुधवारी समुद्राच्या पाण्याची पातळी वाढली असून मोठमोठय़ा लाटाही किनाऱ्याला येऊन धडकत होत्या.  किनारपट्टीवर धोक्याचा लाल बावटा लावण्यात आला आहे. मंगळवारच्या मध्यरात्री पाऊस आणि चक्रीवादळामुळे  ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडण्याचे प्रकार घडले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनारी सुरक्षिततेसाठी खबरदारी घेतली गेली होती. जिल्ह्यातून निसर्ग चक्रीवादळ पुढे सरकले. या वादळामुळे झाडे उन्मळून पडल्याने घरे,वीज वितरण कंपनी आणि मालमत्तेचे नुकसान झाले. सिंधुदुर्ग किल्ला भर समुद्रात आहे, तेथे लोकवस्ती असून वादळामुळे विद्युत पोल, वीज वाहिनीवर झाडे उन्मळून पडल्याने नुकसान झाले. त्यामुळे सिंधुदुर्ग किल्लय़ातील रहिवासी अंधारात राहिले.