रब्बी हंगामाचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापूर जिल्ह्यात मृग नक्षत्राचा पुरेसा पाऊस सहसा होत नाही. परंतु यंदा काही वर्षानंतर प्रथमच रोहिणीपाठोपाठ मृग नक्षत्राच्या पावसाने दमदार हजेरी लावली आहे. अनेक भागात शेतांमध्ये पावसाचे पाणी साचू लागले आहे. त्यामुळे ग्रामीण भागात शेतीकामांसाठी शेतकऱ्यांची धांदल उडाली आहे. पाऊस विश्रांती घेत नसल्याने शेतात पेरणीसाठी शेतकरी वाफसा होण्याची वाट पाहात आहेत.

गेल्या दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस पडत असून गेल्या १५ दिवसांत सरासरी ५५.२९ मिमी प्रमाणे एकूण ६०८.१४ मिमी पाऊस पडला आहे. मंगळवारी सकाळपासून पावसाची रिपरीप सुरू होती. शहरात व ग्रामीण भागात सर्वदूर पाऊस पडत होता. शहरात सकाळपासून ते सायंकाळपर्यंत १६ मिमी पाऊस पडला. अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, मोहोळ, माढा, बार्शी आदी अनेक ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली. या पावसामुळे शेतांमध्ये पाणी येऊन वाढल्याने बांध फुटले आहेत. शेततळ्यांमध्ये पाणी वाढले असून नाल्यांमध्येही पाणी आल्याचे दिसून आले.