तीन दिवसांत मुंबईसह राज्यात मुसळधार

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा यंदा अंदमान ते महाराष्ट्रापर्यंतचा प्रवास वेगाने झाला. मात्र, मोसमी पाऊस महाराष्ट्रात दाखल होताच त्यांचा वेग मंदावला होता. पुणे, अलिबागसह राज्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्य़ांत वेळेआधीच दाखल झालेला मोसमी पाऊस दोन दिवसांपासून स्थिर होता. मात्र, बंगालच्या उपसागरात दोन दिवसांत कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. परिणामी मोसमी वाऱ्यांना पुन्हा चालना मिळणार आहे. त्यामुळे पुढील तीन दिवसांत मोसमी पाऊस मुंबईसह उर्वरित राज्यात प्रगती करेल, अशी शक्यता हवामान विभागाने मंगळवारी व्यक्त के ली आहे.

अंदमान बेटांसह के रळातील आगमन लांबल्याने मोसमी पाऊस यंदा ३ जून रोजी दक्षिण के रळात दाखल झाला. त्यानंतर अरबी समुद्रावरून वेगाने वाटचाल करत दोनच दिवसांत मोसमी पावसाने महाराष्ट्रापर्यंत मजल मारली. नियोजित वेळेच्या चार दिवस आधीच मोसमी पाऊस पुण्यात दाखल झाला, तर मुंबईतही पावसाने हजेरी लावली. मात्र, अद्याप तेथे मोसमी पाऊस दाखल झाला नसल्याचे हवामान विभागाने स्पष्ट के ले आहे. गेल्या रविवारी अलिबाग, पुण्यासह मराठवाडय़ातील काही भागांत मोसमी पाऊस दाखल झाला.

पाऊसभान..

पश्चिम बंगालसह ईशान्य भारतातील राज्यांमध्ये मोसमी पाऊस दाखल झाला आहे. संपूर्ण कर्नाटक, तमिळनाडू, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेशचा काही भाग, संपूर्ण ईशान्य भारत, पश्चिम बंगाल, हिमालयाकडील भाग आणि सिक्कीम राज्यात मोसमी वाऱ्यांनी प्रगती के ली आहे. कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मोसमी वाऱ्यांना गती मिळणार असल्याने येत्या तीन दिवसांत मोसमी वाऱ्यांचा प्रवास सुरू होऊ शकतो, अशी शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

मुंबई, ठाण्यात पावसासाठी अनुकूल स्थिती

रायगडपर्यंत मजल मारलेल्या नैर्ऋत्य मोसमी पावसासाठी अनुकूल स्थिती ठाणे आणि मुंबईतही निर्माण झाल्याने नियोजित तारखेच्या २ दिवस आधीच म्हणजे बुधवारी मोसमी पाऊस मुंबईत दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. याचाच पूर्वपरिणाम म्हणून मंगळवारी मुंबईत अनेक ठिकाणी मुसळधार सरी बरसल्या. दिवसभरात १०० मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. गेले काही दिवस मुंबई महानगर प्रदेशात पावसाच्या मध्यम सरी बरसत आहेत. मंगळवारी सकाळी ९.३० वाजता मुंबईत मेघगर्जनेसह सुरू झालेला मुसळधार पाऊस दुपारी ११.३० ते १२ च्या दरम्यान शांत झाला. त्यानंतर काही वेळ ढगाळ वातावरण होते तर, दुपारी २ वाजता आकाश निरभ्र झाल्याने ऊन पडले. नैर्ऋ त्य मोसमी पाऊस मुंबईत ११ जूनला दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता; मात्र त्यासाठी अनुकू ल स्थिती निर्माण झाल्याने पाऊस बुधवारीच मुंबईत दाखल होण्याची शक्यता असल्याचे मुंबई हवामान विभागाच्या शास्त्रज्ञ शुभांगी भुत्ये यांनी सांगितले. रायगड, ठाणे, मुंबई, पालघर या भागांत बुधवारी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. यावेळी वाऱ्यांचा वेग ३० ते ४० किमी प्रतितास असा असेल. गुरुवारीही ठाणे, मुंबई, रायगड येथे जोरदार पावसाची शक्यता आहे.

‘एमएमआरडीए’कडून २४ तास आपत्कालिन नियंत्रण कक्ष सुरू

मुंबई : पावसाळ्यातील तक्रारींवर तोडगा काढण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्यावतीने ‘२४ तास’ आपत्कालीन नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे पाणी साचणे, रस्त्यावरील खड्डे आणि झाडे पडणे, तसेच अपघाताच्या घटनांमध्ये मदतीसाठी या नियंत्रण कक्षाची मदत होणार आहे. हा कक्ष १ जूनपासून कार्यरत झाला असून १ ऑक्टोबपर्यंत या मान्सून नियंत्रण कक्षाचे काम चालणार आहे, असे एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.  एमएमआरडीएच्यावतीने अनेक ठिकाणी चालू असलेल्या प्रकल्पातील कामाच्या ठिकाणी पादचारी आणि वाहनचालकांची गैरसोय होते. त्यामुळे मान्सून संबंधित तक्रारी दूर करणे, त्यांचा पाठपुरावा करणे, समन्वय साधणे तसेच राज्य सरकार, मुंबई पालिका आणि इतर आपत्ती नियंत्रण संस्था यांच्याशी संवाद साधण्याचे प्राथमिक काम नियंत्रण कक्षातून केले जाणार आहे. नागरिकांना एमएमआरडीएच्या नियंत्रण कक्षाकडे ०२२२६५९४१७६ आणि ८६५७४०२०९० या क्रमांकावर तक्रारी नोंदविता येणार आहे.