07 June 2020

News Flash

वादळी पावसाचे नऊ बळी

राज्यासह संपूर्ण देशात आतापर्यंत अपुरा पाऊस पडलेला असताना तो पुन्हा चांगल्या प्रकारे सक्रिय होण्यासाठी सप्टेंबर महिना उजाडावा लागणार आहे.

| August 22, 2014 01:37 am

राज्यासह संपूर्ण देशात आतापर्यंत अपुरा पाऊस पडलेला असताना तो पुन्हा चांगल्या प्रकारे सक्रिय होण्यासाठी सप्टेंबर महिना उजाडावा लागणार आहे. दरम्यान, राज्यात विदर्भ व मराठवाडय़ात गेल्या दोन दिवसांपासून वादळी वाऱ्यांसह पावसाने धुमाकूळ घातला असून वीज अंगावर पडून आतापर्यंत नऊ जणांचे बळी गेले आहेत. पाऊस पुन्हा सक्रिय होण्यासाठी पुढील महिन्याची वाट पाहावी लागणार असली तरी दरम्यानच्या काळात राज्यातील काही ठिकाणी वादळी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मात्र, त्याची व्याप्ती फारशी नसेल त्यामुळे मराठवाडा आणि विदर्भातील दुष्काळी स्थिती बदलण्याची लगेच तरी शक्यता नाही.
या वेळी मोसमी पावसामध्ये मोठय़ा प्रमाणात चढउतार पाहायला मिळाले. तो तब्बल दीड महिने उशिराने सक्रिय झाला. त्यानंतर महिनाभर चांगला पाऊस पडला. आता आठ-दहा दिवसांपासून पावसाने पुन्हा दडी मारली आहे. काही ठिकाणी पडणारा वादळी पाऊस वगळता सर्वदूर पाऊस गायब झाला आहे. देशात सध्या सरासरीच्या १८ टक्के कमी पाऊस झाला आहे. महाराष्ट्रात त्याहून बिकट स्थिती आहे. राज्याच्या चारही उपविभागांमध्ये अपुरा पाऊस आहे. कोकणात तो सरासरीच्या १३ टक्के कमी, तर मध्य महाराष्ट्रात सरासरीच्या १८ टक्के कमी पडला आहे. विदर्भ आणि मराठवाडय़ात त्यापेक्षा वाईट स्थिती आहे. विदर्भात पावसाचे प्रमाण सरासरीच्या ३० टक्के कमी, तर मराठवाडय़ात ते तब्बल ६२ टक्क्य़ांनी कमी आहे.
या पाश्र्वभूमीवर येत्या आठ-दहा दिवसांत तरी पावसाचे मोठय़ा प्रमाणावर पुनरागमन होण्याची शक्यता नाही. याबाबत पुणे वेधशाळेच्या संचालक डॉ. सुनीता देवी यांनी सांगितले की, गणेशोत्सवाच्या तोंडावर काही भागात पावसाच्या सरी पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
मात्र, त्याचे प्रमाणही किरकोळच असेल. तोपर्यंत तर काही ठिकाणी उन्हाळी पावसाप्रमाणे वादळी पाऊस अपेक्षित आहे. त्याचा विस्तार अगदीच कमी असेल. त्यामुळे पावसाच्या पुनरागमनासाठी सप्टेंबर महिनाच उजाडावा लागेल.

नांदेडमध्ये चौघांचा मृत्यू
नांदेड जिल्ह्य़ात गुरुवारी काही ठिकाणी वादळ-वाऱ्यासह पाऊस झाला. वीज पडून झालेल्या दुर्घटनेत भोकर तालुक्यात तिघांचा, तर हदगाव तालुक्यात महिलेचा मृत्यू झाला. भोकर तालुक्यातील वागद येथे माय-लेकराचा वीज अंगावर पडून मृत्यू झाला. कौशल्याबाई वागदकर (३५) व सुदर्शन (७) हे दोघे दुपारी शेताकडे जात असताना अचानक पाऊस सुरू झाला. आश्रयासाठी झाडाखाली थांबले असताना वीज कोसळून दोघांचा जागीच मृत्यू झाला. आमदरीवाडी येथील गणेश मेंडके (१८) या तरुणाचा वीज अंगावर पडल्याने मृत्यू झाला. हदगाव तालुक्यातील जांभळा येथे वीज कोसळून चंद्रकला देशमुखे (३२) या महिलेचा बळी घेतला.

यवतमाळमध्ये वीज कोसळून पाच जण ठार
* यवतमाळ जिल्ह्य़ात गुरुवारी तीन ठिकाणी वीज कोसळून पाच जणांचे बळी
गेले आहेत. गुरुवारी पुसद तालुक्यातील तुकाराम पवार (४०) हे शेतात दुचाकीने जात असताना माणिकडोहच्या घाटात त्यांच्या अंगावर वीज पडून
त्यांचा जागीच मृत्यू झाला.
* याच तालुक्यातील मानोली येथील किशोर राठोड (१८) या तरुणाच्या अंगावर वीज पडल्याने त्याचाही जागीच मृत्यू झाला. दुसरी घटना महागाव तालुक्यातील करंजखेड येथे घडली.
* गजानन जाधव आणि संतोष दाटकर हे तिशीतील तरुण शेतात काम करीत असताना त्यांच्या अंगावर वीज कोसळल्याने त्यांचा मृत्यू झाला. तिसरी घटना महागाव तालुक्यातील काळीटेंभी येथील असून रेखा शिंदे (२५) ही महिला शेतात काम करत असताना वीज कोसळून ठार झाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 22, 2014 1:37 am

Web Title: heavy rains killed 9 in maharashtra
Next Stories
1 टंचाईच्या मुकाबल्यासाठी हिंगोलीत सव्वाचार कोटींचा विशेष आराखडा
2 आता राज्य भ्रष्टाचारमुक्त करण्याची वेळ
3 नांदेडमध्ये वीज पडून महिलेसह चौघांचा मृत्यू
Just Now!
X