नागपूरसह विदर्भाचे जनजीवन बुधवारी मध्यरात्रीपासून गुरुवारी दुपापर्यंत झालेल्या मुसळधार पावसामुळे  विस्कळीत झाले आहे. नागपूरमध्ये आजी-नातीसह  दोघे वाहून गेले, तर जिल्ह्य़ातील कळमेश्वरमध्ये घर पडून एक युवक मृत्युमुखी पडला. चाकडोह नाल्यात एका तरुणाचा मृतदेह सापडला. दरम्यान, यवतमाळ जिल्ह्य़ात दोघांचा पुरात वाहून गेल्याने मृत्यू झाला, तर वीज पडून एक महिला मरण पावली. चंद्रपूर, अमरावती जिल्ह्य़ांतील काही धरणांचे दरवाजे उघडण्यात आले.
अपार्टमेन्ट, झोपडपट्टय़ा आणि व्यावसायिक संकुलांतील तळघरातील दुकानांमध्ये पाणी शिरले. अंबाझरी व गोरेवाडा तलाव भरून वाहू लागले. नाग नदी, पिवळी नदी आणि छोटय़ा नाल्यांनाही पूर आला. जरपटक्यात नाल्याच्या काठावरील घर कोसळल्याने तेथील चौघे वाहून गेले. त्यापैकी आजोबा अनंतराव नेवारे आणि त्यांचा नातू यश नेवारे यांना वाचविण्यात आले, तर आजी रेखा नेवारे आणि त्यांची नात तुप्ती नेवारे वाहून गेले. सायंकाळपर्यंत त्यांचे मृतदेह सापडले नव्हते. दरम्यान, रामदासपेठ भागातील काचीपुरा झोपडपट्टीतील मोखाराम मसराम हा रिक्षाचालक नाल्यात तोल गेल्याने वाहून गेला.
कळमेश्वर तालुक्यातील चंद्रभागा नदीला पूर आला असून तिचे पाणी विठ्ठल मंदिरापर्यंत पोहोचले होते. धापेवाडा येथे घर कोसळून संदीप धनगरे (३०) या युवकाचा मृत्यू झाला. तालुक्यातील सात गावांचा मुख्यालयाशी संपर्क तुटला होता. तालुक्यात चार तासांत ११२ मि.मी.पावसाची नोंद करण्यात आली.
सावनेरमार्गावरील पिपळा (डाकबंगला) येथे पुरात काही लोक अडकल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षाला मिळाली आहे. त्यांना तेथून बाहेर काढण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर करण्यात आला. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्य़ातही पाऊस सुरू आहे. अमरावतीत अप्पर वर्धा धरणाचे सात दरवाजे उघडण्यात आले.

रस्ते, चौकांना तलावाचे स्वरूप
छत्तीसगडवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने नागपूरसह विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. त्यानुसार मंगळवारपासूनच पावसाला सुरुवात झाली. बुधवारी रात्रीपासून त्याचा जोर वाढला. गुरुवारी दुपापर्यंत त्याला उसंत नव्हती. सकाळी ६.३० ते दुपारी २.३० या दरम्यान शहरात ८९ मि.मी. पावसाची नोंद झाली. रस्ते व चौकांना तलावाचे स्वरूप आल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती.