मध्य महाराष्ट्र, विदर्भात आज मुसळधार

 पुणे : काही दिवसांपासून कोकण आणि मुंबईपर्यंतच मर्यादित राहिलेला नैर्ऋत्य मोसमी पाऊस सोमवारी सर्वदूर पसरत दमदारपणे कोसळला. मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस कोसळला. कोकण, मुंबई आणि विदर्भात मुसळधार पाऊस झाला. काहीसा कोरडा राहिलेल्या मराठवाडय़ातही काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. मंगळवारी (१७ जुलै) मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मुसळधार, तर मुंबई आणि कोकणातील काही ठिकाणी अतिवृष्टी होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

कोकण आणि मुंबई, ठाणे आदी परिसर वगळता मागील काही दिवसांपासून राज्यात जोरदार पावसाची नोंद झाली नव्हती. मात्र, कमी दाबाचे क्षेत्र विस्तारले असल्याने पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला होता. त्यानुसार राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर वाढला आहे. आठवडय़ापासून पावसाच्या हलक्या सरी कोसळत असलेल्या पुणे आणि परिसरामध्येही सोमवारी चांगला पाऊस झाला. अरबी समुद्रातील समांतर कमी दाबाच्या क्षेत्रामुळे किनारपट्टी भागात दमदार पाऊस होत आहे. उत्तर ओडिशातील कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढली असून चक्राकार वारे दक्षिण-पश्चिम दिशेला कलल्याने विदर्भ, मध्य महाराष्ट्रासह मराठवाडय़ात पावसाचा जोर वाढल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

बंगालच्या उपसागरात आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र गुरुवारी (१९ जुलै) निर्माण होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे पुढील चार ते पाच दिवस राज्यातील पावसाचा जोर असाच कायम राहणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. गेल्या २४ तासांत मुंबई ९० मि.मी, ठाणे ११० मि.मी, श्रीवर्धन ४० मि.मी, सावंतवाडी ८० मि.मी, महाबळेश्वर ३०० मि.मी, लोणावळा २९० मि.मी, उस्मानाबाद १० मि.मी, चंद्रपूर ५० मि.मी पावसाची नोंद झाली.

घाटघर, रतनवाडीला अतिवृष्टीचा तडाखा

अकोले : भंडारदरा पाणलोट क्षेत्रातील घाटघर, रतनवाडी परिसरास अतिवृष्टीचा तडाखा बसला. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कोसळत असलेल्या पावसामुळे मुळा, भंडारदरा धरणांच्या पाणीसाठय़ात मोठी वाढ होत असली तरी आदिवासी भागातील जनजीवन पावसामुळे विस्कळीत झाले आहे.

अतिवृष्टीमुळे मुळा धरणात २४ तासांमध्ये एक टीएमसी पेक्षा अधिक तर भंडारदरा धरणात पाऊण टीएमसी नवीन पाणी आले. याच कालावधीत रतनवाडीला १३ इंच तर घाटघरला १४ इंच एवढा  विक्रमी पाऊस पडला.

तालुक्याच्या पश्चिम भागात आठवडाभरापासून पावसाची संततधार सुरू आहे. गत तीन दिवसांत तर मुसळधार पावसाने मुळा भंडारदरा पाणलोट क्षेत्रास झोडपून काढले. काल पावसाने अधिकच उग्र रूप धारण केले. रात्रभर पावसाचा धुमाकूळ सुरू होता. तालुक्याच्या पश्चिम टोकाला असणाऱ्या,व जिल्ह्यची चेरापुंजी अशी ओळख असणाऱ्या घाटघर येथे तब्बल ३४१ मिमी एवढा पाऊस पडला तर लगतच्या रतनवाडीला ३२७ मिमी पावसाची नोंद झाली .पष्टिद्धr(१५५)म भागात इतरत्रही कमी अधिक प्रमाणात असाच पाऊस पडला. या तुफानी पावसामुळे सर्व परिसर जणू काही काळ जलमय झाला होता. तुडुंब भरलेल्या भात खाचारात पाणी मावेना. तीच गोष्ट ओढे नाल्यांची वाट फुटेल तिकडे पाणी जाऊ  लागले. पाण्याचे लोंढे नदी आणि जलशयांकडे झेपावत होते. २४ तासांत भंडारदारा धरणात ७७२ दलघफू नवीन पाणी आले. तर याच कालावधीत मुळा धरणात तब्बल १ हजार १५२ दलघफू नवीन पाण्याची आवक झाली. आज सकाळी भंडारदरा पाणी साठय़ाने ७ टीएमसीचा टप्पा ओलांडला. दुपारी बारा वाजता धरणातील पाणी साठा ७ हजार २५२ दलघफू झाला होता. उद्या सकाळपर्यंत भंडारदरा ७५ टक्के भरण्याची शक्यता आहे .

भंडारदऱ्याचा तुलनेत काहीसा कमी असला तरी मुळा पाणलोटातही धुवाधार पाऊस पडत आहे. मुळा नदीला आलेल्या लहानशा पुराचे पाणी दुसऱ्या दिवशीही टिकून होते. आज सकाळी कोतुळजवळ मुळा नदीचा विसर्ग १७ हजार २४३ क्युसेक होता. सकाळी मुळा धरणाचा पाणी साठा ८ हजार ७९४ दलघफू होता. मुळा नदीची पाणी पातळी टिकून असल्यामुळे सलग दुसऱ्या दिवशीही मुळा धरणात एक टीएमसी पेक्षा अधिक पाणी येण्याची अपेक्षा आहे.

भंडारदरा एवढेच महत्त्वाचे असणारे निळवंडे धरणही २० टक्के भरले आहे. कळसुबाई शिखर परिसरात झालेल्या तुफानी पावसामुळे कृष्णवंती च्या पाणीपातळीत आज अधिकच वाढ झाली. आज सकाळी वाकी तलावाच्या सांडव्यावरून ३ हजार ६४३ क्युसेक पाणी कृष्णवंतीत पडत होते. शिवाय अन्य ओढे नाले दुथडी भरून वाहत आहेत. हे सर्व पाणी निळवंडे धरणात जमा होते. आज या धरणाच्या पाणीसाठय़ात ३६१ दलघफू पाण्याची भर पडली. आज सकाळी निळवंडे धरणाचा पाणीसाठा १ हजार ६३९ दलघफू झाला होता.

आजचा पाऊस मिमी मध्ये 

भंडारदरा १५२,  वाकी १३६,  पांजरे १६५,  रतनवाडी ३२७,  घाटघर ३४१, निळवंडे २७, अकोले २३, आढळा ७,  कोतुळ १०, संगमनेर २.

मराठवाडय़ात पावसाचा जोर

औरंगाबाद : मराठवाडय़ातील आठही जिल्ह्य़ांमध्ये सोमवारी पावसाचा दिवसभर जोर वाढल्याचे चित्र होते. मागील काही दिवसांपासून मराठवाडय़ाकडे पावसाने पाठ फिरवली. मात्र मागील दोन दिवसात ढगाळ वातावरण आणि अधून-मधून हलकी सर येऊन जाण्याशिवाय पाऊस नव्हता. सोमवारी मात्र दिवसभर चांगला पाऊस बरसत होता. हा पाऊस संपूर्ण मराठवाडय़ात असून पिकांना जीवदान देणारा ठरत आहे. मध्यंतरी पावसाअभावी मराठवाडय़ातील शेतकरी दुबार पेरणीच्या संकटाने चिंतित होता.

औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर व उस्मानाबाद या जिल्ह्य़ांमध्ये सर्वदूर पाऊस होता. औरंगाबाद शहर व परिसरात सोमवारी दिवसभरात चांगला पाऊस झाला. हिंगोली तालुक्यातील समगा गावाजवळील कयाधू नदीवरील पूल खचल्याने या मार्गावरील सुमारे आठ गावांचा संपर्क तुटला आहे. जालना जिल्ह्य़ात बदनापूरसह आठही तालुक्यांमध्ये पाऊस झाला. परभणी, हिंगोलीतही पावसाची रिपरिप सुरू होती. नांदेडमध्ये सोमवारी सकाळी घेतलेल्या २४ तासातील पावसाच्या आकडेवारीनुसार ७.८८ मिमी पावसाची नोंद झाली. लातूरमध्ये गेल्या पाच दिवसांपासून भिज पाऊस पडतो आहे. लातूरमध्ये ९० टक्क्य़ांपेक्षा अधिक पेरण्या झाल्या आहेत. उस्मानाबादेतही दिवसभर पावसाचा जोर होता. सोमवारचा पाऊस मराठवाडय़ात सर्वदूर होता.

गोंदिया जिल्ह्य़ातील चार तालुक्यात अतिवृष्टी

पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्य़ात अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले . गडचिरोली जिल्ह्य़ातील भामरागड तालुक्यातील १०० गावांचा संपर्क तुटला. गोंदिया जिल्ह्य़ात चार तालुक्यात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली. नागपुरातही सकाळी पावसाच्या हलक्या सरी आल्या.

गडचिरोली शहरात सर्वाधिक २३५ मिलिमीटर पाऊस झाला. भामरागडजवळील पर्लकोटा नदीवरून पाणी वाहत असल्याने त्या भागातील १०० गावांचा संपर्क तुटला होता. गडचिरोली तालुक्यात १८४.४ मिमी, भामरागड १०४ मिमी, बामणी २०५ मिमी, पोर्ला येथे १८५ मिमी पाऊस झाला.

चंद्रपूर जिल्हय़ातही रविवारी रात्रीपासून संततधार पाऊस सुरू आहे. ब्रम्हपुरी तालुक्यातील मेंढकी येथे धानाचे रोवणे करत असलेल्या महिला नाल्याच्या पुरात अडकल्या होत्या. त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. राजुरा, कोरपना, चंद्रपूर तालुक्यात घरांची मोठय़ा प्रमाणात पडझड झाली.

गोंदिया जिल्ह्य़ात गेल्या काही दिवसांपासून रिमझिम स्वरूपात बरसणाऱ्या पावसाने रविवारच्या मध्यरात्रीपासून जोर धरला. चार तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. गोंदिया शहरातील रेलटोली परिसर जलमय झाला. गोरेगाव तालुक्यातील पिंडकेपार येथे रेल्वेच्या पुलाखाली पाणी साचल्याने वाहतूक बंद पडली आहे.

अमरावती शहर आणि परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला. गेल्या चोवीस तासात अवघ्या एक मि.मी. पावसाची नोंद झाली. दिवसभर काळेकुट्ट आभाळ आणि पावसाच्या हलक्या सरी येत होत्या. जिल्ह्यात १ जूनपासून आतापर्यंत ३४३ मि.मी. म्हणजे सरासरीच्या ११८ टक्के पाऊस झाला आहे. संपलेल्या चोवीस तासात जिल्ह्यात २.४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक १० मि.मी. पाऊस तिवसा तालुक्यात झाला.

प्राणहिता नदीत तरुण वाहून गेला

प्राणहिता नदीवर मासेमारीकरिता गेलेला व्यंकटेश सिडाम (२८) हा तरुण वाहून गेला. अहेरी तालुक्याच्या ठिकाणाहून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या वांगेपल्ली येथील प्राणहिता नदी घाटावर व्यंकटेश हा मित्रांसोबत डोंग्यात बसून मच्छीमारीसाठी गेला होता. नदीपात्रात डोंगा असताना त्याचा तोल गेला आणि तो पडला. यावेळी त्याच्या बचावासाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र, पाण्याचा वेग इतका होता की तो वाहून दूरवर गेला.

पश्चिम महाराष्ट्राला पावसाने झोडपले ; महाबळेश्वरमध्ये ३०० मि.मी.पाऊस, पंचगंगेला पूर

कोल्हापूर  : पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर या तीनही जिल्ह्य़ांना सोमवारी पावसाने झोडपून काढले. महाराष्ट्राची चेरापुंजी असलेल्या महाबळेश्वरमध्ये आज तब्बल ३०० मि.मी.पाऊस पडला. या पावसाने कृष्णा, कोयना, पंचगंगा आदी नद्यांना मोठे पाणी आले असून पंचगंगेला तर पूरस्थिती असल्याने सर्वत्र सावधानतेचा इशारा दिला आहे. दरम्यान या पावसाने या भागातील कोयनेसह राधानगरी, चांदोली आदी धरणांच्या जलसाठय़ात मोठी वाढ झाली आहे.

कोल्हापूर शहरात सोमवारी पावसाने धुमाकूळ घातला. पंचगंगा नदीची पाणी पातळी धोका पातळीकडे जात असल्याने महापुराचा धोका निर्माण झाला आहे . कोल्हापूर-कळे , गगन बावडा  या कोकणाकडे जाणाऱ्या रस्त्यावर चार ठिकाणी ४ फूट पाणी आल्याने वाहतूक बंद पडली आहे . पाऊ स गेल्या चार दिवसांपासून अक्षरश: धुमाकूळ घालत असून यामुळे जिल्ह्यतील अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. पंचगंगेच्या पाणीपातळीत झपाटय़ाने वाढ झाली आहे. जिल्ह्यतील ६७ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.  पावसामुळे जिल्ह्य़ातील ७० बंधारे पाण्याखाली गेले आहेत. जिल्हा प्रशासन, महापालिका प्रशासन आपत्कालीन स्थितीवर नियंत्रणासाठी सज्ज आहे.

महाबळेश्वरमध्ये रस्ते पाण्याखाली

महाबळेश्वरमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून मागील २४ तासांत ३०० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. या मुसळधार पावसाने ‘वेण्णा लेक’ परिसर जलमय झाला आहे. महाबळेश्वर-पांचगणी रस्त्यावरील वाहतूक पाणीपातळी वाढल्याने बंद ठेवण्यात आली होती. दरम्यान सातारा जिल्ह्यच्या अनेक  भागात मागील २४ तासांत मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.

चांदोलीतून विसर्ग सुरू

चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस कोसळत असल्याने सोमवारपासून धरणातून १२ हजार क्युसेकपर्यंत विसर्ग सुरू करण्यात आला. कोयना धरणातूनही बुधवारपासून २१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. वारणा नदीकाठच्या शेतातील उभी पिके पाण्याखाली गेली आहेत. कोयना, धोम, कण्हेर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही पाऊस पडत असल्याने कृष्णेच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत आहे.