News Flash

एसटीत दाटीवाटी

बसगाडय़ांमध्ये २२ ऐवजी ६० प्रवासी; करोनासंसर्गाचा धोका

बसगाडय़ांमध्ये २२ ऐवजी ६० प्रवासी; करोनासंसर्गाचा धोका

निखिल मेस्त्री, लोकसत्ता

पालघर : डहाणू ते वैतरणा भागांतून नोकरी-व्यवसायासाठी प्रवास करणाऱ्या हजारो खासगी कर्मचाऱ्यांचा लोंढा सध्या एसटी प्रवासाकडे वळला आहे. त्यामुळे बसगाडय़ांमध्ये अत्यंत दाटीवाटीने उभे राहण्याची वेळ प्रवाशांवर येत आहे. एका बसगाडीत अंतराचे नियमाचे पालन करून २२ प्रवाशांची वाहतूक करण्याचा नियम असताना ५० ते ६० प्रवासी कोंबले जात असल्याच्या तक्रारी प्रवाशांनी केल्या आहेत. करोनाकाळात अंतराच्या नियमांची पायमल्ली तर होतच असल्याने संसर्गाचा धोका वाढला आहे. त्यामुळे एसटी प्रशासनाने बसगाडय़ांची संख्या आणि फेऱ्या वाढविण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.

करोनाकाळात नियमांचे पालन करून खासगी आणि एसटी प्रवासी वाहतुकीला मुभा शासनाने दिली आहे. मात्र, एसटीच्या वतीने बसगाडय़ांच्या संख्येत वाढ करण्याऐवजी प्रवाशांना दाटीवाटीने प्रवास करण्यास भाग पाडले जात आहे.

एसटी प्रशासनाने बसगाडय़ांची संख्या आणि फेऱ्यांचे नियोजन केले नसल्याचा आरोप प्रतीक पाटील या प्रवाशाने ‘लोकसत्ता’शी बोलताना केला.

मुंबई आणि लगतच्या भागांत जाण्यासाठी सध्या खासगी वाहतूक सेवा उपलब्ध आहे. याशिवाय आता एसटीच्या बसगाडय़ांची सोय करण्यात आली आहे. त्यातही एसटीचा पर्याय सर्वाना सोयीचा असल्याने अनेक जण बससाठी रांगा लावत आहेत. मात्र, बसगाडय़ांमध्ये अंतराच्या नियमाच्या पालन होताना दिसत नाही. अनेकदा दाटीवाटीने प्रवास करावा लागत असल्याच्या तक्रारी प्रवाशांनी केल्या.

प्रवास यातना

१) खासगी कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांसाठी बोईसर, सफाळे, पालघर एसटी आगारांतून रोज शेकडो फेऱ्या उपलब्ध केल्या जात आहेत, तरीही प्रवाशांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे एसटीच्या फेऱ्या कमी पडत असल्याचे एसटी विभागाने म्हटले आहे. मुंबईतील रुग्णालयांत उपचारांसाठी जाणारे रुग्ण, खासगी कार्यालयांमधील कर्मचारी महिला, अपंग कर्मचारी यांना दाटीवाटीने प्रवास करावा लागत आहे.

२) डहाणू ते वैतरणा दरम्यानचे हजारो खासगी कर्मचारी दररोज एसटीने मुंबई व इतर ठिकाणी प्रवास करीत आहेत. वाहतूक कोंडीमुळे त्यांच्या प्रवासाला बराच वेळ जातो. कामावरून परतत असताना बोरिवली पश्चिम बस आगारात या परतीच्या प्रवाशांची शेकडोच्या संख्येने तासन्तास रांगा लागलेल्या असतात. त्या ठिकाणी एसटीच्या फेऱ्यांचे नियोजन शून्य असल्याचे दिसून आले. परतीच्या प्रवासावेळी सायंकाळी चार ते सात दरम्यान मोठय़ा प्रमाणावर कर्मचारी परतीचा प्रवास करीत असतात. मात्र या वेळी एसटीच्या पुरेशा सेवा उपलब्ध नसल्यामुळे एका एसटीत सुमारे ६० प्रवासी बसवले जातात.

३) परतीच्या प्रवासावेळी बोरिवली ते पालघर हे दोन तासांचे अंतर वाहतूक कोंडीमुळे सुमारे तीन ते चार तासांचा होते. यामध्ये बसमधले उभ्या असलेल्या महिला,अपंग प्रवाशांना यामुळे प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहे.

असून अडचण नसून खोळंबा..

रेल्वेची प्रवासी क्षमता मोठी आहे. तिच्या तुलनेत एसटीचे नियोजन अत्यंत कमकुवत आहे, असे निरीक्षण एका प्रवाशाने नोंदवले. एसटी असली तरी त्यातून प्रवाशांना सध्या तरी कोणताही फायदा होताना दिसत नाही. एसटी प्रशासनाने प्रवाशांची सोय केली असली तरी अपुऱ्या बसगाडय़ा, कमी फेऱ्या यामुळे अंतराच्या नियमांचे पालन करून प्रवास करणे अत्यंत कठीण झाले आहे. त्यामुळे सध्या एसटी असली तरी अडचणी आहेतच, पण तिची पुरेशी संख्या नसल्याने प्रवाशांचा खोळंबा होत आहे. कमी गाडय़ा आणि जास्त प्रवासी अशी सध्या अवस्था आहे. त्यातही वाहतूक कोंडीचा एसटीच्या फेऱ्यांवर परिणाम होत आहे.

प्रवासी वाढतच जात असले तरी त्यादृष्टीने एसटीचे नियोजन सुरूच आहे. फेऱ्या वाढवल्या जात आहेत. तरीही प्रवाशांची संख्या जास्त आहे. प्रवासादरम्यान नियमांचे पालन केले जाईल.

– आशीष चौधरी, एसटी विभागीय व्यवस्थापक, पालघर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 9, 2020 2:48 am

Web Title: heavy rush in st buses zws 70
Next Stories
1 राष्ट्रीय महामार्गावर कचरा टाकणाऱ्या कारखान्यांचा कचऱ्यातून शोध
2 जव्हारचा पर्यटन व्यवसाय करोनामुळे अडचणीत
3 लुटीला लगाम
Just Now!
X