26 February 2021

News Flash

मुंबई, ठाण्यासह कोकणात पुढील ४८ तासांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

ठाणे, डोंबिवलीत मुसळधार पावसाला सुरूवात

संग्रहित छायाचित्र

मुंबई शहराबरोबरच उपनगरांमध्ये सकाळपासूनच जोरदार ते मध्यम स्वरुपाच्या पावसाने हजेरी लावली आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवलीसारख्या शहरांमध्ये विजांच्या कडकडाटांसह पाऊस पडत आहे. मुंबईतील काही भागांसह ठाणे व कोकण विभागात पुढील ४८ तास मध्यम ते मुसळधार स्वरुपाच्या पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

सकाळपासून मुंबई व आसपासच्या काही भागांमध्ये पावसाने तुरळक हजेरी लावली होती. सॅटेलाइट व रडारवरील छायाचित्रांवरुन राज्यावर पावसाळी ढग दाटून आल्याचे दिसत आहे. मध्य भारतामध्ये कमी दाबाचा पट्टा कार्यरत असल्याने पुढील काही दिवस कोकण किनारपट्टीसहीत विदर्भामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

मुंबईसाठी येलो अर्लट देण्यात आलेला आहे. आगामी ४८ तासांत मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता आहे. उत्तर कोकणात रत्नागिरी व सिंधुदुर्गमध्ये देखील येत्या पाच दिवसांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. याचबरोबर मध्य महाराष्ट्र व मराठवड्यात देखील चांगला पाऊस असणार आहे. मराठवाड्यात पावसाचे प्रमाण जास्त असणार आहे, अशी माहिती प्रादेशिक हवामान विभागाच्या शुभांगी भुते यांनी दिली आहे.

जुलै महिन्याच्या अखेपर्यंत राज्याच्या विविध भागांत पाऊस कायम राहणार आहे. प्रामुख्याने कोकण आणि विदर्भामध्ये पुढील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलेला आहे.

कमी दाबाच्या पट्टय़ामुळे गेल्या तीन ते चार दिवसांपासून पावसाला अनुकूल स्थिती होती. परिणामी कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली. अनेक दिवस पावसाने दडी मारलेल्या पुणे शहर आणि जिल्ह्यातही पाऊस झाला. मराठवाडय़ातील औरंगाबाद आणि बीड जिल्ह्यांत काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. विदर्भातही पावसाची हजेरी होती.

सध्याही मध्य भारतामध्ये कमी दाबाचा पट्टा आहे. त्याचप्रमाणे पूर्वमध्य अरबी समुद्रात कोकण किनारपट्टीवर वाऱ्यांची चक्रिय स्थिती आहे. त्यामुळे कोकण, विदर्भासह राज्याच्या इतर भागांत कमी-अधिक प्रमाणात पाऊस कायम राहणार आहे.

हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार आजआणि उद्या प्रामुख्याने विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. अनेक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाटही होऊ शकेल. ३० जुलैला कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधारांचा इशारा देण्यात आला आहे. २७ ते ३० जुलै या कालावधीत मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ातही काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 28, 2020 2:13 pm

Web Title: heavy showers for mumbai thane and konkan region for 48 hrs msr 87
Next Stories
1 राज्यात २४ तासांत १३८ पोलीस करोना पॉझिटिव्ह, तिघांचा मृत्यू
2 …तर आम्ही शिवसेनेसोबत एकत्र येऊन सरकार स्थापन करण्यास तयार – चंद्रकांत पाटील
3 बीडमधील हलगर्जीपणा; करोनाबाधित पोलिसाची लावली ड्यूटी, त्यानंतर …
Just Now!
X