10 April 2020

News Flash

आयर्वनि पुलावर अवजड वाहतुकीला बंदी शक्य

सांगली शहरालगत उभारण्यात आलेल्या आयर्वनि पुलाची लांबी ८२० फूट आणि रूंदी ३२ फूट आहे.

सांगलीतील ८६ वर्षांच्या जुन्या पुलाबाबत लवकरच निर्णय होणार

महाडच्या पूल दुर्घटनेनंतर जाग आलेल्या प्रशासनाकडून सांगलीजवळील ८६ वष्रे वयोमानाचा आयर्वनि पूल अवजड वाहतुकीसाठी बंद केला जाण्याची शक्यता आहे. या पुलाला अनेक ठिकाणी तडे गेले आहेत. त्याचे दगड निसटले आहेत, तसेच त्यावर झाडेही उगवली आहेत. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, वाहतूक नियंत्रण, परिवहन विभागाचे प्रतिनिधी यांची गुरूवारी बठक झाली  या बंदीबाबत लवकरच निर्णय होणार असल्याचे समजते.

पुण्याला जाण्यासाठी संस्थानकाळात सांगलीच्या गणेश मंदिराजवळ सांगली संस्थानने कृष्णा नदीवर पुलाची उभारणी केली. या पुलाचे उद्घाटन १८ नोव्हेंबर १९२९ रोजी तत्कालीन गव्हर्नर जनरल लार्ड बॅरन आयर्वनि व त्यांच्या पत्नी लेडी आयर्वनि यांच्या हस्ते करण्यात आले. या पुलासाठी संस्थानने सहा लाख रूपये खर्च केला होता. संस्थानचे अभियंते व्ही. जी. भावे, व्ही. एन. वर्तक आणि मेसर्स व्ही. आर. रानडे अ‍ॅण्ड सन्स यांनी या पुलाची उभारणी केली.

सांगली शहरालगत उभारण्यात आलेल्या आयर्वनि पुलाची लांबी ८२० फूट आणि रूंदी ३२ फूट आहे. पुलाची उंची ७० फूट असून आर्च पध्दतीने या पुलाची उभारणी करण्यात आली आहे. पुलाचे आयुष्य संपल्याने या पुलावरून वाहतूक बंद करण्याबाबत विचार सुरू झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाला पर्याय म्हणून नवीन पुलाची उभारणी बांधा, वापरा व हस्तांतरित करा या योजनेतून केली.

मात्र नवीन पुलावर जाण्यासाठी किमान चार ते पाच किलोमीटर अंतर जादा पडत असल्याने याच पुलावरून वाहतूक सुरू राहिली आहे. या पुलावरून महापालिकेने सांगलीवाडीसाठी पिण्याच्या व ड्रेनेजसाठी सव्वा फूट व्यासाच्या नलिका टाकलेल्या आहेत. याशिवाय संरक्षक लोखंडी बॅरिकेटसही जीर्ण झाले आहेत. पुलाचा पायाही अखंड वाळू उपशामुळे उघड झाला असल्याने पुलाच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला आहे.

पुलाच्या दगडी बांधकामामध्ये वड व पिंपळाची झाडे उगविली असल्यामुळे बांधकामाला भेगाही काही ठिकाणी पडल्या असल्याने पुलावरील वाहतूक धोकादायक ठरली आहे. या पुलावरून जड वाहतूक बंद करण्याची सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दहा वर्षांपूर्वीच करण्यात आली असून तसा फलक पुलाच्या सुरूवातीस लावण्यात आला आहे.

या पुलावरील अवजड वाहतूक बंद करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा क्षेत्र अध्यक्ष कमलाकर पाटील, महापालिकेतील विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी, सागर घोडके आदी कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्याकडे लेखी निवेदनाद्बारे केली. तसेच, शहर सुधार समितीचे अ‍ॅड. अमित शिंदे, आíकटेक्ट रवींद्र चव्हाण यांनीही या पुलावरील वाहतूक रोखावी अन्यथा न्यायालयात दाद मागण्याचा इशारा दिला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांची चर्चा

या पुलाच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यानंतर जिल्हाधिकारी गायकवाड यांनी तातडीने बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. या पुलावरील अवजड वाहनांची वाहतूक रोखण्यासाठी कमी उंचीची लोखंडी कमान उभी करून तो हलक्या वाहनांसाठी खुला ठेवण्याबाबत या बठकीत चर्चा करण्यात आली आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 5, 2016 12:54 am

Web Title: heavy traffic ban at ayarvani bridge
Next Stories
1 कुराण टेकडीवरील २४ रहिवासी सुखरूप बाहेर
2 अवनखेड नदीवरील जुना पूल वाहतुकीसाठी बंद
3 विनाहेल्मेट गाडी चालवल्यास आता ५०० रुपये दंड, दिवाकर रावतेंचा नवा आदेश
Just Now!
X