अलिबाग : मुंबई-गोवा महामार्गावर गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी मोठी वाहतूक कोंडी झाली. रुंदीकरणाचे काम आणि खड्डयामुळे महामार्गाची दुरवस्था झाली असून, पेण ते वडखळदरम्यानचे सहा किलोमीटर अंतर पार करण्यासाठी वाहनचालकांना तब्बल दीड ते दोन तास लागत होते.

मुंबई-गोवा महामार्गावर वडखळ ते पेणदरम्यान रस्तारुंदीकरणाचे काम गेल्या आठ वर्षांपासून रखडले आहे. २०११ मध्ये सुरू झालेले रुंदीकरणाचे काम अद्याप पूर्ण झालेले नसून, महामार्गाची दुरवस्था झाल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे.

पेण ते वडखळ मार्गावर मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे दोन दिवसांपासून वाहतुकीचा वेग मंदावला असून, मोठी वाहतूक कोंडी होत आहे. खड्डे बुजवण्यासाठी मुरूम आणि खडी टाकण्यात येत आहे. मात्र, मुसळधार पावसाने चिखल होत असून, रस्त्याची दुरवस्था झाली आहे. पेण आणि वडखळ येथील पूल वाहतुकीस खुले केल्याने वाहतूक कोंडी कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, या पुलांचे काम अद्याप पूर्ण झालेले नसून पुलांचा दुपदरी भागाच वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. या पुलांना जोडणारे रस्ते अरुंद असल्याने वाहतूक कोंडीत भरच पडली आहे.

 

मुंबई-गोवा महामार्गावरील पेण-वडखळदरम्यान खड्डयांमुळे वाहतुकीचा वेग मंदावला आहे. मात्र, आम्ही वाहतूक सुरळीत करण्यास प्रयत्नशील आहोत.

– सुरेश वऱ्हाडे, वाहतूक पोलीस निरीक्षक, रायगड</p>