वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ठरावीक वेळेसाठी नियोजन

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर सुट्टीच्या दिवशी होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. सुट्टीच्या दिवशी विशिष्ट कालावधीत आता अवजड वाहनांना प्रवेश बंदी घालण्याची अधिसूचना पुन्हा जारी करण्यात आली आहे.

यापूर्वी तीन महिन्यांसाठी ही अधिसूचना जारी करण्यात आली होती. तिची मुदत संपत आल्याने आता वाहतूक विभागाने नवीन अधिसूचना जारी केली आहे. बंदी घालण्यात आलेल्या वाहनांमध्ये तीन एक्सल, मल्टी एक्सल आणि ओडीसी वाहनांचा समावेश असणार आहे. सुट्टीच्या आदल्या दिवशी, सुट्टीच्या दिवशी आणि सुट्टी समाप्त होण्याच्या दिवशी ठरावीक वेळेत ही प्रवेश बंदी कायम असणार आहे. या कालावधीत द्रुतगती महामार्गावर खालापूर टोल प्लाझा ते उर्स टोल प्लाझा दरम्यान अवजड वाहनांना प्रवेश करता येणार नाही.

दर आठवडय़ाला शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवार या दिवशी तसेच लागोपाठ दोन दिवस सुट्टय़ा आल्यास आदल्या दिवसापासून सुट्टी समाप्त होण्याच्या दुसऱ्या दिवसापर्यंत ठरावीक वेळेत ही वाहतूक नियंत्रित केली जाणार आहे. वाहतूक विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक आर के पद्मनाभन यांनी मोटर वाहन कायद्याच्या कलम ११५ अन्वये याबाबतची अधिसूचना जारी केली आहे.

कधी असेल अवजड वाहनांना बंदी..

मुंबई पुणे मार्गावर

  • शुक्रवारी संध्याकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत
  • शनिवारी सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत

पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर

  • रविवारी संध्याकाळी ५ ते रात्री ८ वाजेपर्यंत
  • सोमवारी सकाळी ६.३० ते सकाळी ९.३० वाजेपर्यंत