लोकसत्ता प्रतिनिधी

पालघर : पालघर-बोईसर मार्गावरील अपूर्ण कामे जूनच्या दुसऱ्या आठवडय़ापर्यंत पूर्ण करण्यासाठी संबंधित ठेकेदार प्रयत्नशील आहे. त्यामुळे साधारणपणे १० जूननंतर बंदी असलेल्या अवजड वाहनांची वाहतूक सुरू होण्याची शक्यता आहे.  दररोज सुमारे पाच हजार वाहनांची या मार्गावरून वाहतूक होत असते.

बोईसर कुरगाव ते पालघर येथील नव्याने उभारण्यात येणाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंतच्या पंधरा किलोमीटरच्या रस्त्याचे दहा मीटपर्यंत रुंदीकरण व आवश्यकतेनुसार काँक्रीटीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. करोना संक्रमणाच्या पाश्र्वभूमीवर या रस्त्याच्या कामांतर्गत अनेक टप्प्यांतील कामे अपूर्णावस्थेत असून पाऊस झाल्यास नागरिकांची मोठय़ा प्रमाणात गैरसोय होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात हे काम करणाऱ्या पालघर रोड प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या प्रतिनिधीशी संपर्क साधला असता उमरोळी येथे काँक्रीट करण्याचे काम पूर्ण झाले असून साइडपट्टीचे काम येत्या काही दिवसांत पूर्ण केले जाणार आहे. या ठिकाणाहून सध्या लहान वाहनांची वाहतूक सुरू केली असून जूनच्या १०-१२ तारखेपर्यंत अवजड वाहनांचीची वाहतूक सुरू केली जाणार आहे.

बोईसर येथील सिडको कॉलनी ते भीमनगर या पट्टय़ातील काम मनुष्यबळाच्या मर्यादेमुळे विलंबाने सुरू असले तरी हे काम १० जूनपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. भीमनगर ते बीएआरसी रहिवासी कॉलनीपर्यंतचे डांबरीकरणदेखील याच कालावधीत पूर्ण करण्यात येणार आहे.

बीएआरसी गेट ते एमआयडीसी नाका या टप्प्यातील काँक्रीटीकरणाचे काम पावसाळ्यात टप्प्याटप्प्याने करण्यात येणार असून या वेळी एका बाजूची वाहतूक सुरू ठेवण्याची योजना आहे.  सरावली व पंचाळी येथील रुंदीकरण व काँक्रीटीकरण याचे काम पावसाळा संपल्यानंतरच हाती घेण्यात येईल.

उमरोळी ग्रामपंचायत ते उमरोळी मैदानापर्यंतच्या काँक्रीटीकरण याचे काम तसेच पुढे कोळगाव पेट्रोल पंपपर्यंतचे डांबरीकरणाचे कामदेखील पावसाळ्यानंतर हाती घेण्यात येणार आहे. पेट्रोल पंप कोळगाव गणपती मंदिराचे डांबरीकरण पूर्णत्वास आले आहे.  टॅप्स कर्मचारी रहिवासी संकुल ते कुरगावदरम्यान रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडे तोडण्याचे काम अपेक्षित गतीने पूर्ण होत नसल्याने पावसाळा सुरू होण्यापूर्वी डांबरीकरणाचा थर रुंदीकरण केलेल्या भागात करण्यात येईल, असे सांगण्यात आले.

अपघातांच्या संख्येत वाढ

या रहदारीच्या महत्त्वाच्या रस्ताचे काही भागांत चौपदरीकरण झाल्याने वाहनांचा वेग वाढला आहे. काही भागांत रस्त्याचे काम अजूनही हाती घेतले नसून काही ठिकाणी काम अपूर्णावस्थेमध्ये आहे. अचानक अरुंद होणाऱ्या रस्त्यामुळे गेल्या काही दिवसांत अपघातांची संख्या वाढली असून ठेकेदारांनी साइन बोर्ड किंवा रिफ्लेक्टर लावून अरुंद होणाऱ्या रस्त्याची सूचना देण्यात यावी, अशी मागणी पुढे येत आहे.