एकीकडे जगभरामध्ये करोनाविरुद्धचा लढा सुरु आहे. हजारो डॉक्टर्स रुग्णांना वाचवण्यासाठी दिवस रात्र काम करत आहेत. करोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून अनेक तास पीपीई (पर्नल प्रोटेक्टीव्ह इक्वपमेंट) कीटमध्ये अगदी घामाने ओले चिंब होईपर्यंत काम करत आहेत. करोनाविरुद्धच्या लढ्यामध्ये पीपीई कीट खूप महत्वाचे आहे. ्त्यामुळेच देशामध्येही पीपीई कीटच्या निर्मितीचे काम सुरु करण्यात आलं आहे. एकीकडे या पीपीई कीटची मागणी आणि महत्व वाढत असतानाच दुसरीकडे दुसरीकडे साताऱ्यामध्ये चक्क पीपीई कीट घालून चोरांनी ज्वेलर्सच्या दुकानावर डल्ला मारल्याची घटना समोर आली आहे.

साताऱ्यामध्ये एका ज्वेलर्सच्या दुकानात चोरांनी चक्क पीपीई कीट घालून दरोडा टाकल्याची घटना उघडकीस आली आहे. करोनाच्या रुग्णांवर उपचार करताना संसर्ग होऊ नये म्हणून डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांकडून पीपीई कीट वापरले जातात. मात्र साताऱ्यामध्ये चोरांनी आपली ओळख लपवण्यासाठी पीपीई कीटचा वापर केल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे. यासंदर्भातील वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तीन चोर पीपीई कीट घालून ज्वेलर्सच्या दुकानामध्ये शिरले आणि त्यांनी दुकानामधून ७८ तोळे (७८० ग्राम) सोनं लंपास केलं. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांना हे चोर ओळख लपवण्यासाठी पीपीई कीट घालून आल्याचे समजले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे चोर दुकानातील वेगवेगळ्या कपाटांमधून सोन्या चांदीचे दागीने एका पिशवीमध्ये टाकताना दिसत आहेत.

पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या सीसीटीव्ही फुटेज ही तीन दिवसांपूर्वीची म्हणजेच ५ जुलैची आहे. यात चोरांनी डोक्यावर डॉक्टरांप्रमाणे प्लास्टिकच्या टोप्या, तोंडावर मास्क, प्लास्टिकचे जॅकेट तसेच हातात ग्लोव्हज घातल्याचे दिसत आहे.

या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरु केला आहे. आपल्या दुकानामधील ७८ तोळं सोनं चोरीला गेल्याचं ज्वेलर्सने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटलं आहे. दुकानाच्या भितींला भगदाड पाडून या चोरांनी दुकानात प्रवेश केल्याचं मालकाचं म्हणणं आहे. आता या प्रकरणामध्ये चोरांची ओळख पटवण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.