हौसेला मोल नाही तसाच काहीसा प्रकार कर्जतमध्ये  घडला. कर्जत नगरपंचायतीचे नगरसेवक तारेक सय्यद यांच्या मुलीचा विवाह बीड जिल्हयातील पाटोदा येथील महंमद आयाज सय्यद यांच्या समवेत रविवारी  झाला. तारेक सय्यद यांनी त्यांची लाडकी कन्या मिजबा हिला हेलिकॉप्टरने सासरी पाठवले. कर्जत शहर व तालुक्यात हा चर्चेचा विषय झाला आहे. यावेळी नगराध्यक्ष नामदेव राऊत, संतोष मेहत्रे, सोमनाथ कुलथे, लालासाहेब शेळके, रज्जाक झारेकरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते

मुस्लीम समाजामध्ये अशा प्रकारे मुलीस लग्न झाल्यावर हेलिकॉप्टरने पाठविण्याची घटना  दुर्मीळ आहे .कारण आजही धर्म आणि परंपरा यास प्राधान्य देणारा हा समाज आहे. मिजबा आणि मोहंमद अयाज यांचा विवाह धार्मिक परंपरेनुसार झाला. यानंतर सजवलेल्या गाडीमध्ये नवरा व नवरी यांना बसविण्यात आले तसेच दोन्हीकडील सर्व पाहुणे त्यांची वाहने घेऊन  कर्जतमधील दादा पाटील कॉलेजच्या पाठीमागील माळरानावर आले तिथे एक हेलिकॉप्टर थांबवले होते. मुलीच्या बिदाईची रस्म तिथेच झाली. यावेळी मुलीची आई व इतर नातेवाईकांच्या डोळ्यात  मिसबाला निरोप देताना अश्रू अनावर झाले होते.  यांनतर नवरा, नवरी, नवरीचा भाऊ आणि एक पाठराखीण असे चौघेजण हेलिकॉप्टरमध्ये बसले आणि नवरदेवाच्या पाटोदा गावाकडे रवाना झाले. हे हेलिकॉप्टर तिथे गेल्यावर तिथे पण हेलिकॉप्टर उतरण्याची व्यवस्था करण्यात आली.