राज्यात सर्वत्र लवकरच दुचाकीस्वारांसाठी हेल्मेटसक्तीची अंमलबजावणी करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे परिवहान मंत्री दिवाकर रावते यांनी बुधवारी औरंगाबादमध्ये केली.
औरंगाबाद शहरात एक फेब्रुवारीपासून दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट वापरणे सक्तीचे करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर हेल्मेट घालून प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वारांचे गुलाबपुष्प देऊन बुधवारी परिवहन मंत्र्यांकडून कौतुक करण्यात आले. या कार्यक्रमावेळी दिवाकर रावते यांनी औरंगाबादमधील हेल्मेटसक्तीचे कौतुक करून राज्यात सर्वत्र लवकरच हेल्मेटसक्तीची अंमलबजावणी करण्यात येईल, असे सांगितले.
मोटार वाहन कायद्यातील तरतुदींनुसार प्रत्येक दुचाकीस्वाराने वाहन चालविताना हेल्मेट वापरणे बंधनकारक आहे. मात्र, सर्वत्र याची अंमलबजावणी होत नाही. आता हा नियम मोडणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई करून हेल्मेटसक्तीची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
औरंगाबादमध्ये हेल्मेटसक्तीच्या पहिल्याच दिवशी ५ हजार २३७ जणांकडून प्रत्येकी १०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सक्तीच्या अंमलबजावणीसाठी शहरामध्ये २० पोलीस निरीक्षक, ४५ सहायक निरीक्षक आणि ३०० पोलीस कर्मचारी २० ठिकाणी तैनात केले होते. दुचाकीस्वाराचे उघडे डोके दिसले की प्रत्येक चौकात दुचाकीस्वाराला बाजूला घेऊन दंड आकारण्यात येत आहे.