सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करीत जनमानसात पोलीस खात्याविषयीची विश्वासार्हता वाढविण्याचा प्रयत्न हाती घेतला असताना त्यांनी वाहतुकीच्या प्रश्नाकडे लक्ष घालत दुचाकीस्वारांसाठी येत्या आठवडय़ानंतर हेल्मेट वापरण्याचे बंधन घालण्याचे ठरविले आहे. हेल्मेट घातल्याशिवाय कोणीही दुचाकी चालवू नये. त्याची सुरूवात पोलीस खात्यापासूनच करणार असल्याचे सेनगावकर यांनी सांगितले.
सोलापूर श्रमिक पत्रकार संघात बुधवारी झालेल्या वार्तालाप कार्यक्रमात पोलीस आयुक्त सेनगावकर यांनी दुचाकी चालविताना हेल्मेट वापरण्याच्या कायद्याची अंमलबजावणी करणार असल्याचे जाहीर केले.हेल्मेट वापरण्याचे बंधन घालताना त्यामागे स्वत:च्या सुरक्षितेची काळजी घेण्याचीच आपली भावना असल्याचे त्यांनी नमूद केले. या प्रश्नावर कोणीही वाद घालणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
दहा लाखांपेक्षा अधिक लोकसंख्येच्या सोलापूर शहरात दुचाकी वाहनांची संख्या दोन लाख ४० हजारांपेक्षा जास्त आहे. शहरात रस्त्यावर दुचाकी वाहनांचे अपघात होऊन त्यात विद्यार्थी मुले-मुलींचा मृत्यू होतो. अशा घटना वाढल्या आहेत. समाजाच्या हितासाठीच कायदे आहेत. दुचाकी चालवितानादेखील हेल्मेट वापराचे बंधन हेसुध्दा अखेर समाजाच्या हिताचेच आहे. परंतु हे आपल्यावर आलेले बालंट आहे, असे कोणीही मानता कामा नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. कोणत्याही चांगल्या गोष्टीसाठी सुरूवातीला विरोध होतो. परंतु तो आपल्याच हितासाठी असल्याची खात्री पटते, तेव्हा विरोध मावळतो. हेल्मेट सक्तीवरून विरोधाचा सूर निघून प्रसंगी वाद उद्भवल्यास तो कसा मिटवायचा आणि कायद्याची अंमलबजावणी कशी करायची, हे आपणास चांगले ठाऊक आहे, असेही सेनगावकर यांनी नमूद केले.
गेल्या १९ मे रोजी सेनगावकर यांनी पोलीस आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतली. आपल्या महिना-सव्वा महिन्याच्या काळात त्यांनी पोलीस खात्यात शिस्तीचे धडे देत भरीव सुधारणा केल्या असून गुन्हेगारीवर पायबंद घालण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत. विशेषत: अवैध धंदे नेस्तनाबूत होण्यासाठी परिणामकारक उपाययोजना अमलात आणल्या आहेत. आपला व्यावसायिक पोलिसिंगवर विश्वास आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी ४० टक्के, गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी ३० टक्के आणि वाहतूक व्यवस्थेत सुधारणा होण्यासाठी ३० टक्के याप्रमाणे आपला प्राधान्यक्रम राहणार असल्याचे सांगताना सेनगावकर यांनी, सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून आपण पोलीस प्रशासन चालवित असल्याचा दावा केला. सराईत गुन्हेगार, त्यांच्या टोळ्या आणि अवैध धंदेवाल्यांविरोधात एपीडीए, मोक्का, हद्दपारी यासारखी कठोर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे. ही कारवाई झालेला गुन्हेगार पुन्हा गुन्हेगारीकडे वळणार नाही, अशी परिणामकारकता साधली जाणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.