सन २००९ च्या विधानसभा निवडणुकीतील मुद्यावरून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना निवडणूक आयोगाच्या चौकशीला सामोरे जावे लागले. पण दुसऱ्या बाजूला त्या निवडणुकीत त्यांनी पक्षाच्या बहुसंख्य उमेदवारांना जशी मुक्तहस्ते आर्थिक मदत केली, तशी मदत आगामी निवडणुकीत करा, अशी मागणी पक्षाच्या आमदारांनी विद्यमान मुख्यमंत्र्यांकडे केल्याचे समजते.
राज्यात मुख्यमंत्री बदलाची चर्चा जोरात सुरू असली, तरी त्यामुळे विचलित न होता मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मागील काही दिवसात पक्षाच्या आमदारांना गटा-गटाने पाचारण करून त्यांच्याशी ‘वन टू वन’ पद्धतीने चर्चा केली. नांदेड जिल्ह्य़ातील रावसाहेब अंतापूरकर, ओमप्रकाश पोकर्णा, माधवराव जवळगावकर या आमदारांना एकाच दिवशी एका सत्रात बोलविण्यात आले. अंतापूरकर यांनी तर आपल्या मतदारसंघातल्या कामांसाठी एका विस्तृत निवेदनाद्वारे ४० कोटींची मागणी केली. या भेटीत प्रत्येक आमदाराने कोटींचीच भाषा केल्याचे समजते.
‘अरे बाप रे’!
लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवाच्या पाश्र्वभूमीवर विधानसभा निवडणुकीच्या वेळी प्रत्येक जिल्ह्य़ात कशी स्थिती असेल याचा अंदाज मुख्यमंत्र्यांनी आमदारांशी संवाद साधून घेतला. या भेटीचे निरोप आमदारांना मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आले होते.
गेल्या विधानसभा निवडणुकीत अशोक चव्हाण मुख्यमंत्री होते. त्यावेळी उमेदवारांना द्यावयाच्या आर्थिक मदतीची सारी सूत्रे त्यांच्या हाती होती. भोकर मतदारसंघात त्यांनी स्वत:ची निवडणूक फक्त ७ लाख रुपयांत पार पाडली. पण जिल्ह्य़ातील पक्षाच्या अन्य उमेदवारांना सढळ हस्ते मदत झाल्याने लढविलेल्या सर्व जागा पक्षाला मिळाल्या. आता आगामी निवडणुकीत विद्यमान मुख्यमंत्र्यांनी मदतीचा ‘अशोक पॅटर्न’ राबवावा, असे काही आमदारांनी त्यांना सुचविले. अशोक चव्हाण यांनी पक्षाच्या उमेदवारांना दिलेल्या निधीचे आकडे ऐकून विद्यमान मुख्यमंत्री अवाक झाले. त्यावर ‘अरे बाप रे’ अशी प्रतिक्रियाही त्यांनी नोंदविल्याचे सांगण्यात येते.