News Flash

करोना तपासणीसाठी खासगी यंत्रणेची मदत

जिल्ह्यातील वाढता संसर्ग पाहता अडीचशेहून अधिक तपासणी अहवाल प्रलंबित आहेत.

संग्रहीत

जनुकीय तपासणी आरटीपीसीआर करण्यास मर्यादा

पालघर : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात रुग्णांची संख्या वाढत असून करोना संसर्ग झालेल्या नागरिकांच्या जोखीम संपर्कातील व्यक्तींच्या तपासणीवर प्रशासन भर देणार आहे. असे असताना जनुकीय तपासणी आरटीपीसीआर करण्यास मर्यादा येत असून त्यामुळे जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांची मदत घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

पालघर जिल्ह्यामध्ये सध्या डहाणू येथील ‘मॉडेल रुरल हेल्थ रिसर्च युनिट’ या केंद्रामध्ये सद्य:स्थितीत शंभर जुनकीय नमुने तपासली जात असून मुंबई येथील हॅफकिन इन्स्टिट्यूटमध्ये २०० तसेच आईसीएमआरच्या परळ केंद्रात १०० नमुने तपासले जात आहेत. पूर्वी मुंबईमध्ये तपासल्या जाणाऱ्या नमुन्यांची संख्या पाचशेपेक्षा अधिक होती. मात्र राज्यातील अन्य भागात रुग्णसंख्या वाढल्याने मुंबई मधील शासकीय व्यवस्थेत पालघर जिल्ह्यातील फक्त ३०० ते  ४०० जूनकीय नमुन्यांची तपासणी होऊ शकते अशी परिस्थिती आहे. जिल्ह्यातील वाढता संसर्ग पाहता अडीचशेहून अधिक तपासणी अहवाल प्रलंबित आहेत.

पालघर जिल्ह्यात जनुकीय तपासणी क्षमता वाढवण्यासाठी डहाणू येथील वेदांत रुग्णालय येथे दररोज दीडशे नमुन्यांची तपासणी करण्याची व्यवस्था उभारण्यात आली आहे. या खासगी रुग्णालयाने ही तपासणी विनामूल्य करून देण्याचे मान्य केले असून तपासण्यासाठी लागणारी सामग्री, रसायने व इतर साधने साहित्य पुरविण्यात यावे याकरिता वैद्यकीय विभागाकडे जिल्हा प्रशासनाने मागणी केली आहे.

‘टास्क फोर्स’ची बैठक

जिल्ह्यातील आजार संक्रमणाचा आढावा घेण्यासाठी ‘टास्क फोर्स’ची बैठक आठवडा अखेरीस संपन्न झाली. यामध्ये जनुकीय चाचणी क्षमता वाढवण्याबरोबरच खासगी डॉक्टरांकडे प्रतिजन तपासणीचे किट देण्याचे निश्चित करण्यात आले. प्रतिजन किट देण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाने संसर्गचे प्रमाण अधिक असणाऱ्या पालघर व बोईसर शहरातील खासगी डॉक्टरांची यादी लवकरात लवकर प्रशासनाला देण्याचे सूचित करण्यात आले. पालघर नगर परिषदेतर्फे चालवण्यात येणारे फीवर क्लिनिक पुन्हा सुरू करून त्या ठिकाणी प्रतिजन तपासणीची व्यवस्था उभारण्यात यावी असेदेखील या बैठकीत ठरविण्यात आले.

काही नागरिक करोना तपासणी करण्याऐवजी थेट (एचआरसीटी) ‘हाय रिझोल्युशन सिटीस्कॅन’ करत असल्याचे आढळल्याने जिल्ह्यातील ही सेवा पुरविणाऱ्या चार केंद्रांवर प्रतिजन चाचणी किट ठेवून येणाऱ्या रुग्णांची तपासणी करण्याचे आदेशदेखील देण्यात येत आहेत. जिल्ह्यातील जनुकीय तपासणीच्या मर्यादा लक्षात घेऊन आजाराची लक्षणे दिसणाऱ्याची प्रतिजन चाचणी अधिकाधिक प्रमाणात करण्याचे सर्व संबंधितांना सूचित करण्यात आले.

करोना रुग्णाची संख्या २२६ वर

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सक्रिय करोना रुग्णाची संख्येमध्ये २१ ने भर पडली असून रुग्णसंख्या २२६ वर पोहोचली आह. त्यापैकी पालघर तालुक्यात ९०, जव्हार तालुक्यात ८६, वाडा तालुक्यात ३२ तर डहाणू तालुक्यातील १७ रुग्णांचा समावेश आहे. गेल्या २४ तासांत पालघर तालुक्यात १५ रुग्ण वाढले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 17, 2021 12:04 am

Web Title: help of a private mechanism for corona inspection akp 94
टॅग : Coronavirus
Next Stories
1 पालघर जिल्ह्यात वीज मीटरचा तुटवडा
2 माकपच्या इशाऱ्यानंतर सागर नाका येथील तात्पुरती पोलीस चौकी हटवली
3 “महाराष्ट्राला दर आठवड्याला करोना प्रतिबंध लसीचे २० लाख डोस उपलब्ध करून द्यावेत”
Just Now!
X