महाराष्ट्र राज्य हागणदारीमुक्त करण्यासाठी राज्य शासनामार्फत सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत असुन येणाऱ्या काळात संपूर्ण राज्यासह जालना जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठी प्रत्येकाने आपल्या दारी शौचालयाची उभारणी करुन त्याचा नियमित वापर करण्याचे आवाहन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी केले.

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ५७ व्या वर्धापन दिनानिमित्त पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री लोणीकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. राज्यातील ११ जिल्हे १४८ तालुके व १६३६० ग्राम पंचायती हागणदारी मुक्त झाले आहेत. मराठवाड्यात सर्वप्रथम परतूर आणि जाफ्राबाद हे दोन तालुके हागणदारी मुक्त झाले असुन मंठा तालुका हागणदारीमुक्तीच्या वाटेवर आहे. येणाऱ्या काळात जालना जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

जालना जिल्ह्याचा विकास अधिकगतीने करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असुन मराठवाड्यासह जिल्ह्यातील जवळपास ४० हजार लोकांना रोजगार देऊ शकणाऱ्या आणि सुमारे ६ हजार कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल करण्याची क्षमता असलेल्या १०९ कोटी रुपये गुंतवणुकीचा ‘सीडपार्क’ जालना परिसरात करण्यास मंत्रीमंडळाने मान्यता दिली आहे. या ‘सीडपार्क’ मुळे बियाणे उद्योगासमोरील अडचणी दूर करण्याबरोबरच पायाभुत सुविधांचा विकास करुन बियाणे उत्पादन क्षेत्रात पोषक वातावरण निर्मितीद्वारे रोजगार आणि गुंतवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार असल्याचे त्यांनी सांगितलं.
मराठवाड्यासह राज्यातील विद्यार्थ्यांना रसायन तंत्रज्ञानाबाबत शिक्षण घेता यावे यासाठी जिल्ह्यातील सिरसवाडी येथे २०० हेक्टर शासनाच्या अधिपत्याखाली अभिमत विद्यापीठाचा दर्जा असणाऱ्या रसायन तंत्रज्ञान महाविद्यालय उभारण्यासही मंत्री मंडळाने मान्यता दिली असल्याचेही पालकमंत्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.

यावेळी ३९ कोटी रुपयांचा विमाहप्ता भरुन पिकविमा योजनेत देशात अव्वल स्थान मिळविल्याबद्दल जालना जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दशरथ तांभाळे यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.