News Flash

रखडलेल्या सिंचन प्रकल्पांसाठी जागतिक बँकेचे साहाय्य घेणार

राज्यातील रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी एकरकमी निधी उपलब्ध करून देण्यासाठी येत्या चार महिन्यांत निर्णय घेतला जाणार असून, यासाठी जागतिक बँकेकडून अर्थसाहाय्य घेण्याची शासनाची तयारी

| April 18, 2015 04:00 am

राज्यातील रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी एकरकमी निधी उपलब्ध करून देण्यासाठी येत्या चार महिन्यांत निर्णय घेतला जाणार असून, यासाठी जागतिक बँकेकडून अर्थसाहाय्य घेण्याची शासनाची तयारी असल्याचे प्रतिपादन जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी शुक्रवारी केले. म्हैसाळ योजनेच्या डोंगरवाडी प्रकल्पाचे उद्घाटन केल्यानंतर भोसे येथे झालेल्या शेतकरी मेळाव्यात त्यांनी ही घोषणा केली.
राज्यातील रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ७० हजार कोटींची गरज आहे. राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये सिंचन विभागासाठी जास्तीतजास्त साडेसात हजार कोटींची उपलब्धता होऊ शकते. नसíगक वाढीनुसार अपूर्ण प्रकल्पाचा खर्च दिवसेंदिवस वाढतच जात असल्याने उपलब्ध निधीतून सिंचन प्रकल्प पूर्ण होणे कठीण आहे. यामुळे जागतिक बँक अथवा वित्तीय संस्थेकडून एकरकमी पसे उपलब्ध करून देऊन प्रकल्प पूर्ण करण्यात येतील. प्रकल्पासाठी पसे उपलब्ध करीत असतानाच शासन, बँक आणि ठेकेदार यांच्यात वेळेचा करार करण्यात येणार आहे. तसा निर्णय येत्या चार महिन्यांत घेण्यात येईल असे महाजन यांनी सांगितले.
या वेळी महाजन म्हणाले, की जलसंपदा विभागात झालेल्या भ्रष्टाचाराची लाचलुचपत विभागामार्फत ही चौकशी करण्यात येत आहे. कोणीही कितीही मोठा असला तरी त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. लाचलुचपत विभागाला चौकशीसाठी लागणारी कागदपत्रे सध्या उपलब्ध करून देण्यात आली असून, कोकणातील १२ आणि विदर्भातील ३ प्रकल्पांची चौकशी सध्या सुरू आहे.
राज्याच्या वाटय़ाचे पाणी निश्चित झाले असून उपलब्ध पाण्यावरच सिंचन क्षेत्र वाढविणे गरजेचे असल्याने ठिबक सिंचन सक्तीचे करावे लागणार आहे  असे सांगून महाजन म्हणाले, की अपूर्ण योजना पूर्ण करणे ही शासनाची जबाबदारी असून, शेती व्यवसाय शाश्वत होण्यासाठी शासन प्रयत्न करेल.
या वेळी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे म्हणाले, की दुष्काळाचे कायमस्वरूपी उच्चाटन करण्यासाठी सिंचन योजना पूर्ण करण्याबरोबरच जलयुक्त शिवार ही संकल्पना शासनाने हाती घेतली असून, शेतीसाठी शाश्वत सिंचन व्यवस्था उपलब्ध करण्याची शासनाची जबाबदारी आहे. पाणी योजना पूर्ण करण्याकडे काँग्रेस व राष्ट्रवादीने जाणीवपूर्वक प्रयत्न केले नाहीत त्यामुळेच हे प्रकल्प रखडले. विदर्भासाठी जादा निधी दिला जात असल्याचा आरोप होत असला तरी अनुशेष दूर केला जात असून अपूर्ण प्रकल्पासाठी अनुशेषाचा मुद्दा उपस्थित होत नाही. यापुढील काळात जयंत पाटील व पतंगराव कदम यांना घरी बसविण्याचे काम येथील लोकच करतील असा विश्वास व्यक्त करून शिवतारे यांनी पतंगराव म्हणजे एक जोकर असल्याची टीका केली.
या वेळी खा. संजयकाका पाटील, आ. उल्हास पाटील, आ. सुरेश खाडे व माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांची भाषणे झाली. या कार्यक्रमास आ. शिवाजीराव नाईक, आ. अनिल बाबर, आ. सुधीर गाडगीळ, मकरंद देशपांडे, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष शेखर इनामदार, जिल्हाध्यक्ष राजाराम गरुड, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विकास सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 18, 2015 4:00 am

Web Title: help will take for stalled irrigation projects from world bank
टॅग : Help,Sangli
Next Stories
1 निवडणुकीच्या प्रचाराकडे राष्ट्रवादीच्या नेत्यांची पाठ!
2 दर्डा गेले कुणीकडे?
3 दुष्काळग्रस्त मराठवाडय़ात पाणी बाजार तेजीत
Just Now!
X