दिगंबर शिंदे

सलग ९० तासांहून अधिक काळ तो घरच्या ओढीने पायपीट करीत होता. पोटात काही नाही, मिळेल तिथे पाणी पित होता. आणि घरचा उंबरठा कधी गाठतो या चिंतेत त्याची पायपीट चालू होती. गाव हाकेच्या अंतरावर आले. आता पोहोचणार या समाधानात असतानाच थकलेल्या शरीराने धीर सोडला. ग्लानी येऊन तो महामार्गावरच कोसळला. अज्ञाताने खिशातील मोबाइलवरून घरी कळविले. मायेच्या मातेचे काळीज धास्तावले. तिने नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांना खबरबात दिली. तातडीने हालचाली झाल्या आणि मूर्च्छित पडलेल्या तरुणाला रुग्णालयात आसरा आणि मायेची उब लाभली.

इस्लामपूर शहरातील अर्जुन जाधव हा युवक पुणे येथे वाहनचालक म्हणून काम करत आपल्या संसाराचा गाडा चालवत होता. करोनाच्या संकटाचा विळखा वाढत चालल्याने कामाचे वांदे झाले आणि भाकरीचा प्रश्न मोठा होत गेला. कोणाकडून मिळेल ते खाऊन काही दिवस काढले. परत तेही मिळायची पंचायत झाली. यामुळे गडय़ा आपले गाव बरे म्हणून गावचा रस्ता धरला. पुणे ते इस्लामपूर असा पायी  प्रवास सुरू झाला. वाटेत कोणी खायला दिले तर पोटाची भूक भागायची नाही तर उपाशी पोटीच पुढील रस्ता पायी कापायचा. रात्रीच्या वेळी रस्त्याकडेच्या हॉटेल, धाब्याच्या पायरीवरच विसावा घ्यायचा आणि परत गावचा रस्ता धरायचा असा या अर्जुनचा चार दिवस प्रवास सुरू होता.

शुक्रवारी कासेगावजवळ प्रशासनाच्या अधिकारी व कर्मचारी यांची भेट झाली. सर्व हकीकत सांगितल्यावर क्वोरंटाइनचा शिक्का मळकटलेल्या हातावर पडला आणि पुढे सरकला. त्यात नेल्रे-केदारवाडी दरम्यान येऊन पाय व संपूर्ण शरीर थकल्याने एका झाडाखाली कोसळला. दरम्यान एका पादचाऱ्याच्या मोबाइलवरुन उरुण-इस्लामपुरात राहाणाऱ्या त्याच्या माउलीशी संपर्क केला व मी घरी येतोय, अशा तुटक शब्दात संवाद साधला.

ही हकीकत आईने शेजारच्या एका भगिनीला सांगितली. त्या भगिनीने शहरातील अनेकांना याबाबत मदतीची हाक दिली मात्र प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी नगरसेविका प्रतिभा शिंदे यांच्याकडून नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांचा मोबाइल नंबर घेऊन थेट संपर्क साधला. सर्व हकीकत सांगत मदतीची विनंती केली

यावर तत्काळ वैद्यकीय अधिकारी डॉ. साकेत पाटील यांना संपर्क करून रुग्णवाहिका पाठवून देऊन त्याला उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करा अशा सूचना दिल्या. यावर तत्काळ यंत्रणा राबली गेली व काही मिनिटांत अर्जुनला उपचारासाठी दाखल करण्यात आले. चार दिवसांचा पायी प्रवास व पोटाची अन्नाविना झालेली आबाळ यामुळे तसेच पायाला सूज येऊन शरीरामध्ये थकवा भिनल्याचे निदान झाले. त्याच्यावर आता उपचार सुरू आहेत. नगराध्यक्ष निशिकांत पाटील, नगरसेवक वैभव पवार, माजी नगरसेवह सतीश महाडिक यांचे प्रयत्न एका तरुणाला आणि त्याच्या माउलीला आधार देणारे ठरले.