लाखनी तालुक्यातील मुरमाडी/सावरी येथील अल्पवयीन तीन सख्ख्या बहिणी तनुजा (११), प्राची (९) व प्रिया(४) यांचा मृत्यू अज्ञात नराधमांनी केलेल्या बलात्काराने झाल्याचे शवचिकित्सा अहवालातून स्पष्ट झाले आहे. नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक राजेंद्र सिंग यांनी याला दुजोरा दिला असून आरोपींचा सुगावा देणाऱ्यांना ५० हजाराचे बक्षीसही जाहीर केले. अज्ञात आरोपींविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
शवचिकित्सा अहवाल उघड होताच लाखनीतील वातावरण तणावाचे झाले आहे. आई-वडील कामासाठी शेतावर जात असल्याने अल्पवयीन मुलींना एकटे शाळेत पाठवायचे कसे, हा मुख्य प्रश्न पालकांपुढे निर्माण झाला असून लोक दहशतीत असल्याचे आमदार नाना पटोले यांनी सांगितले.  मुलींवर झालेला बलात्कार आणि हत्येला पोलीस खात्याचा बेजबाबदारपणा कारणीभूत ठरल्याचा आरोप पटोले यांनी केला. गुरूवारी दिवसभर तीनही मुली घरी आल्या नव्हत्या त्यामुळे मुलींची आई, आजोबा हे लाखनी पोलीस ठाण्यात रात्री ९ वाजता तक्रार देण्यासाठी गेले होते. त्यांना पोलिसांनी रात्री दीड वाजेपर्यंत बसवून ठेवले. १५ फेब्रुवारीला लाखनी/मुरमाडी सावरी येथील सुमारे २०० महिलांनी जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ आरती सिंह आणि जिल्हाधिकारी डॉ सच्चिन्द्र प्रताप सिंह यांना भेटण्याचा प्रयत्न केला. मात्र, भेट होऊ शकली नाही.
शनिवारी या तीनही बहिणींचे मृतदेह आढळून आले होते.