श्री साईबाबांचे समाधी मंदिर  उद्या (शनिवार) रात्री ९ वाजून ११ मिनिटांनी उडवून देण्याच्या धमकीपत्राच्या पाश्र्वभूमीवर साईबाबांच्या समाधी मंदिराची सुरक्षाव्यवस्था अतिदक्ष करण्यात आली आहे. मंदिर परिसर व शहरात नेहमीच्या बंदोबस्ताखेरीज अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
साईबाबा समाधी मंदिरात प्रवेश करण्यासाठी असलेल्या चारीही प्रवेशद्वारांवर धातुशोधक यंत्रणेच्या माध्यमातून भाविकांची कडक तपासणी केल्यानंतरच साईभक्तांना मंदिरात सोडले जात आहे. मोबाईल, कॅमेरा, इलेट्रॉनिक वस्तू, नारळ प्रसाद व अन्य संशयास्पद वस्तू समाधी मंदिर परिसरात नेण्यास प्रतिबंध करण्यात आला. समाधी मंदिर परिसरात मोबाइलचे जॅमर कार्यान्वित करण्यात आले आहेत.
समाधी मंदिर व शिवालय उडवून देण्या-या धमकीपत्राचा पोलीस व गुप्तचर यंत्रणेने कसून शोध घेतला, मात्र कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही. समाधी मंदिर परिसर, बसस्थानक, प्रसादालय, साईबाबा रुग्णालय व अन्य महत्त्वाच्या ठिकाणी साध्या वेशातील पोलिसांची गस्त सुरू आहे. दिवाळीच्या सुटय़ांमुळे शिर्डीत साईभक्तांची गर्दी आहे. श्वानपथक तसेच बॉम्बशोधक यंत्रणेच्या माध्यमातून वेळोवेळी तपासणी केली जात आहे. साईभक्तांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. एखादी संशयास्पद वस्तू अगर बॅग आढळल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन संस्थान प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. साईबाबा मंदिर उडवून देण्याच्या धमकीपत्रामुळे शिर्डीतील गर्दीवर कोणताही परिणाम झाला नाही. ‘श्रद्धा व सबुरी’ या साईंच्या शिकवणुकीचा प्रत्यय शिर्डीतील वाढत्या गर्दीमुळे दिसून आला.
सुरक्षाव्यवस्थेला अडसर ठरत असलेले जनसपंर्क कार्यालय व व्हीआयपी पासेस यंत्रणा दोन दिवसांपूर्वीच समाधी मंदिर परिसरातून द्वारकामाई भक्तनिवासमध्ये हलविण्यात आले होते. या निर्णयाचे साईभक्तांनी व शिर्डी ग्रामस्थांनी स्वागत केले. मात्र गुरुवारी रात्री जनसंपर्क कार्यालय जुन्या प्रसादालय इमारतीत थाटण्यात आल्याने साईभक्तांनी नाराजी व्यक्त केली. संस्थानच्या त्रिसदस्य समितीने घेतलेला निर्णय का बदलण्यात आला याबाबत चर्चेला उधाण आले आहे.