News Flash

पुण्यातील सनबर्न फेस्टिवलचा मार्ग मोकळा; सुनावणी घेण्यास न्यायालयाचा नकार

तहसीलदारांची परवानगी असल्याने सुनावणीस नकार

पुण्यातील सनबर्न फेस्टिवलचा मार्ग मोकळा; सुनावणी घेण्यास न्यायालयाचा नकार
सनबर्न फेस्टिवल (संग्रहित छायाचित्र)

पुण्यात सनबर्न फेस्टिवलच्या आयोजनाचा मार्ग मोकळा झाला आहे. या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. सनबर्नच्या आयोजनाला तहसीलदारांनी परवानगी दिलेली आहे, अशी माहिती सरकारी वकिलांनी उच्च न्यायालयात दिली आहे. त्यामुळे या प्रकरणात सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे सनबर्न फेस्टिवलच्या आयोजनाचा मार्ग मोकळा झाला आहे.

राज्य सरकारने सनबर्न फेस्टिवलला परवानगी दिली आहे. मात्र स्थानिक लोक आणि काही हिंदुत्ववादी संघटनांनी सनबर्न फेस्टिवलला विरोध केला होता. पुण्यातील शिवसेनेशी संबंधित असलेले शेतकरी संदीप भोंडगे यांनी या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र सनबर्न फेस्टिवलला तहसीलदारांनी परवानगी दिली आहे. त्यामुळे याबद्दल सुनावणी घेण्यास न्यायालयाने नकार दिला. त्यामुळे पुण्यातील सनबर्न फेस्टिवलच्या आयोजनात आता कोणताच अडथळा राहिलेला नाही. आजपासून सनबर्न फेस्टिवलला सुरुवात होते आहे.

‘सनबर्न फेस्टिवल हा बेकायदेशीर कार्यक्रम आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. या कार्यक्रमात अंमली पदार्थांचे सेवन केले जाते. त्यामुळेच गोव्यात या कार्यक्रमावर दोन वर्षे बंदी घालण्यात आली होती,’ असे म्हणत संदीप भोंडगे यांनी सनबर्न फेस्टिवलविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र न्यायालयाने भोंडगे यांच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला.

पुण्यातील सनबर्न फेस्टिवलला सनातन संस्थेनेदेखील विरोध केला होता. सनबर्नकडून करचुकवेगिरी केली जात असल्याचे, सनबर्न फेस्टिवलमध्ये अंमली पदार्थांचे सेवन होत असल्याचे आरोप सनातन संस्थेकडून करण्यात आले होते. ‘संतांच्या भूमीत नंगानाच होऊ देणार नाही,’ असे सनातन संस्थेने म्हटले होते. ‘याआधी गोव्यात सनबर्न फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी एका तरुणीचा अंमली पदार्थाच्या सेवनाने मृत्यू झाला होता. मात्र त्यावेळी सनबर्न फेस्टिवलच्या आयोजकांनी जबाबदारी झटकली होती. त्यामुळे या फेस्टिवलचे आयोजित करताना यामधील कोणत्याही अनुचित प्रकारासाठी आयोजकच जबाबदार असतील, हे लिखित स्वरुपात कबूल करुन घ्या,’ असे सनातन संस्थेने पत्रकार परिषदेत म्हटले होते.

दुपारी २ ते रात्री १० या वेळेत सनबर्न फेस्टिवलचे आयोजन करण्यात येणार आहे. खाद्य, संगीत आणि मनोरंजन ही सनबर्न फेस्टिवलची संकल्पना आहे. गोव्यात २००७ मध्ये पहिल्यांदा सनबर्नचे आयोजन करण्यात आले होते. २८ डिसेंबरपासून पुण्यात आयोजित करण्यात येणाऱ्या अडीच ते तीन लाख लोक उपस्थित राहण्याचा अंदाज आहे. सनबर्न फेस्टिवलच्या एका तिकीटाची किंमत दोन हजार रुपये आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 28, 2016 12:30 pm

Web Title: high court rejected to take hearing on sunburn festival in pune
Next Stories
1 राहुल गांधींच्या आरोपांना मोदींनी उत्तर द्यावे – शिवराज पाटील
2 सांगलीत जयंत पाटील यांची कसोटी!
3 आश्रमशाळा तपासणीची ‘औपचारिकता’
Just Now!
X