स्थानिक पातळीवर काँग्रेस नेत्यांशी वाद ओढवून घेणाऱ्या अधिकाऱ्यांची थेट उचलबांगडी करण्याचे धोरण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अवलंबल्याने राज्यातील वरिष्ठ प्रशासकीय वर्तुळात अस्वस्थता पसरली आहे.
दोन वर्षांपूर्वी मुख्यमंत्री पदाची सूत्रे चव्हाण यांनी हाती घेतली तेव्हा आदर्श घोटाळय़ावरून काही सनदी अधिकारी गजाआड झाल्याने प्रशासकीय वर्तुळात बरीच अस्वस्थता होती. या वर्तुळाला तेव्हा आश्वस्त करण्याचे काम चव्हाण यांनीच केले होते. नंतर हळूहळू प्रशासनावर मजबूत पकड निर्माण केल्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांवर कारवाईचा धडाका सुरू केल्याने पुन्हा एकदा प्रशासकीय वर्तुळात अस्वस्थता पसरली आहे. काही महिन्यापूर्वी गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी सुमंत भांगे यांचा तेथील काँग्रेसचे आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांच्याशी वाद झाला होता. कार्यालयात उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांचे समर्थन डॉ. उसेंडी यांनी केले होते. यासाठी त्यांनी जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वाराला कुलूप ठोकले होते. भांगे यांनी तक्रार केल्यानंतर आमदारांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
या घटनेनंतर तातडीने सुमंत भांगे यांची बदली करण्यात आली. सुरूवातीला त्यांना कुठेही नेमणूक देण्यात आली नाही. नंतर नांदेडला त्याच पदावर पाठवण्यात आले. नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू असताना लातूर महापालिकेचे आयुक्त रूपेश जयवंशी यांचा कचरा गोळा करण्याच्या मुद्यावरून काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांशी वाद झाला. हा वाद गाजू लागताच जयवंशी यांची गेल्या आठवडय़ात तातडीने गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी म्हणून बदली करण्यात आली. सनदी अधिकारी असलेले रूपेश जयवंशी यांनी या आधी परिविक्षाधीन कालावधीत गडचिरोलीचे उपविभागीय अधिकारी तसेच पालिकेचे मुख्याधिकारी म्हणून काम केले होते. साधारणपणे सनदी अधिकाऱ्यांना परिविक्षाधीन कालावधी पूर्ण करणाऱ्या जिल्हय़ात पुन्हा नेमणूक दिली जात नाही. जयवंशी यांना मात्र पुन्हा गडचिरोलीत पाठवण्यात आले. अधिवेशनाच्या काळात मुख्यमंत्री ताडोबाला आलेले असताना येथील काँग्रेस नेत्यांनी जिल्हाधिकारी विजय वाघमारे पक्षाच्या शिष्टमंडळाना भेटत नाहीत अशी तक्रार केली होती. या तक्रारीचा आधार घेत मुख्यमंत्र्यांनी सर्व अधिकाऱ्यांच्या समक्ष जिल्हाधिकाऱ्यांना चांगलेच फटकारले. त्यामुळे नाराज झालेले वाघमारे तीन दिवस कार्यालयाकडे फिरकलेच नाहीत. गेल्या महिन्यात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर ठाणे जिल्हय़ात फेसबूकवरील कॉमेंटवरून मोठा वाद झाला होता. या वादात दोन तरूणींवर कारवाई करणाऱ्या पालघरच्या ठाणेदाराला निलंबित करावे, अशी गृह खात्याची भावना होती. मुख्यमंत्र्यांनी मात्र ठाणेदारासोबतच ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक रवींद्र सेनगावकर यांनाही निलंबित केले. या सर्व घटनाक्रमांवर बारीक नजर ठेवून असलेल्या वरिष्ठ प्रशासकीय वर्तुळात म्हणूनच अस्वस्थता पसरली आहे. क्षुल्लक कारणावरून थेट कारवाईचा बडगा उगारला जात असल्याने अधिकाऱ्यांच्या वर्तुळात बरीच नाराजी आहे.