रत्नागिरी जिल्ह्यात करोनाबाधितांचा आकडा  वाढत असला तरी जिल्ह्यातील ९ तालुक्यांपैकी मुख्यत्वे रत्नागिरी, चिपळूण आणि खेड या तालुक्यांमध्ये त्याचा जास्त प्रभाव असल्याचे दिसून येत आहे.

गुरुवारी सायंकाळपर्यंतच्या चोवीस तासांत जिल्ह्यात नवीन ५४ करोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. त्यापैकी रत्नागिरी तालुक्यातील सर्वांत जास्त, २१ रूग्ण असून कळंबणी (खेड)-१७ आणि कामथे (चिपळूण) -११, येथेही बाधितांचे प्रमाण सतत वाढते आहे. त्या तुलनेत उरलेल्या ६ तालुक्यांमध्ये या महामारीचा प्रादूर्भाव नियंत्रणात आहे.

गेल्या एप्रिल महिन्यापासूनच्या सक्रीय करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १७६७ झाली असून करोनामुक्त रूग्णांची संख्या ११६९ आहे.

दरम्यान, दापोली येथील एका रूग्णाचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील करोनामुळे मृतांची एकूण संख्या ५९ वर पोचली आहे. रत्नागिरी तालुक्यात २१ नव्याने सापडलेल्या २१ करोनाबाधित रुग्णांमध्ये २ पोलिस आणि एका परिचारिकेसह शहर व तालुक्यातील अशोकनगर परटवणे, पोमेंडी बु., शांतीनगर नाचणे , साई नगर , खेडशी , पेठ पूर्णगड , जागुष्टे कॉलनी, वैभव विहार कॉम्प्लेक्स माळनाका , कुवारबाव पोलीस क्वोटर्स , बोर्डिंग रोड , कापडगाव बौद्धवाडी आणि शासकीय जिल्हा रूग्णालयात उपचार घेत असलेल्या दोघांचा समावेश आहे.