News Flash

उत्तरप्रदेशातील ‘हायप्रोफाईल’ आंतरराज्यीय टोळीला अटक

दरोडे टाकणाऱ्या उत्तरप्रदेशातील टोळीला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने रात्री पकडले

भरदिवसा घरफोडय़ा करणारी व दरोडे टाकणारी उत्तर प्रदेशातील हायप्रोफाईल टोळी नगरच्या पोलिसांनी पकडली. जिल्हा पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी त्याची माहिती दिली. अतिरिक्त अधीक्षक जयंत मीना, पोलिस निरीक्षक दिलीप पवार आदी उपस्थित होते.

अर्धा किलो सोने, ७५० ग्रॅम चांदीसह २० लाखांचा ऐवज जप्त

नगर : महागडय़ा कारमध्ये व सुटाबुटात येऊन टेहळणी करुन भरदिवसा घरफोडय़ा करणाऱ्या दरोडे टाकणाऱ्या उत्तरप्रदेशातील टोळीला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने रात्री पकडले. टोळीकडून पोलिसांनी कारसह अर्धा किलो सोन्याचे दागिने व ७५० ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने असा सुमारे २० लाख ३४ हजार रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. केवळ महाराष्ट्रच नाही, तर इतर राज्यातही या टोळीने दरोडे घातल्याचा संशय पोलिसांना वाटतो आहे.

जिल्हा पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी ही माहिती दिली. या वेळी आजच रुजू झालेले अतिरिक्त पोलिस अधीक्षक जयंत मीना, शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार आदी उपस्थित होते. इरफान इर्शद कुरेशी (३८), इनाम महेमुद कुरेशी (३६), अस्कीन बसरुद्दिन मलिक (३५), इर्शाद अब्दुल रहीम झोजा (४५) या चौघांना अटक करण्यात आली आहे. या चौघांनाही राहुरीच्या न्यायालयाने ११ दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. या टोळीतील नदीम उर्फ बल्ली कुरेशी हा फरार झाला आहे. अटक केलेले चौघे उत्तरप्रदेशातील हापुर, बुलंदशहर भागातील आहेत.

या टोळीने दोन दिवसांपूर्वी राहुरीत भरदिवसा केलेल्या दोन चोऱ्यांची कबुली दिली आहे. या चोऱ्यात लुटलेले दागिनेही पोलिसांनी हस्तगत केले आहेत. राहुरीत चोऱ्या केल्यानंतर ही टोळी लगेच सांगली, सातारा भागात गेली होती. तेथेही या टोळीने चोऱ्या, दरोडे टाकल्याचा संशय आहे. तेथून ही टोळी बारामतीमार्गे पुन्हा नगरहून राहुरीत पोचली होती. पोलिसांनी टोळीला दरोडय़ाच्या तयारीत असताना अटक केली व राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक कैलास देशमाने, श्रीधर गुट्टे, सुधीर पाटील हवालदार सोन्याबापु नानेकर, विष्णु घोडेचोर, मन्सुर सय्यद, योगेश गोसावी, रवींद्र कर्डिले, मनोहर गोसावी, विजय ठोंबरे, सुनील चव्हाण, संतोष लोंढे, दत्तात्रेय गव्हाणे, संदीप घोडके, विजयकुमार वेठेकर यांच्या पथकाने टोळीला पकडले.

कारमध्ये व सुटाबुटात टेहळणी

उत्तरप्रदेशातील ही टोळी सुशिक्षित आहे, सुटबुट व कारमध्ये वावरते. महागडय़ा कारमध्ये येऊन बंद घर किंवा फ्लॅटची टेहळणी करीत असे. या टोळीने खास प्रकारच्या आधुनिक कटावण्या तयार करुन घेतल्या आहेत, कितीही भक्कम कुलूप असले तरी या कटावणीने तुटते. अवघ्या काही मिनिटात घरफोडी करण्यात ही टोळी पटाईत आहे. राहुरीतील डॉक्टरकडील घरफोडी केवळ ८ ते ९ मिनिटात केल्याचे सीसीटीव्ही फूटेजमध्ये आढळले आहे. त्यांच्याकडील हुंडाई व्हेरना कारमध्ये खास कप्पा करुन घेऊन त्यात लुटीचे दागिने ठेवले होते. टोळीकडे मोबाईलच्या आकाराचा इलेक्ट्रॉनिक तराजू आहे. लुटीतील दागिन्यांचे वाटप करण्यासाठी त्याचा वापर केला जात असल्याचे पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 10, 2018 12:48 am

Web Title: high profile gang from uttar pardesh arrested in ahmednagar
Next Stories
1 नाक मुरडूनही शिवसेना भाजपबरोबरच!
2 शेततळय़ात बुडून माय-लेकाचा मृत्यू
3 चाळीतील कांदा विक्रीला आल्याने दरात घसरण
Just Now!
X