यंदा गळीत हंगाम सुरू झालेल्या १७८ साखर कारखान्यांपैकी १५७ कारखान्यांनी ऊसाचे गाळप थांबवले असून हंगामाच्या अखेरीस यंदा राज्यात विक्रमी ९ कोटी २२ लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले आहे. गेल्या दशकभरातील सरासरीपेक्षा ऊस गाळप तीस टक्क्यांपेक्षा अधिक आहे. यंदा १०३९ लाख क्विंटल साखर राज्यातील कारखान्यांमध्ये तयार झाली आहे.
साखर आयुक्तालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार यंदा ९९ सहकारी आणि ७९ खाजगी, अशा एकूण १७८ साखर कारखान्यांनी हंगाम सुरू केला होता. ऊस पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याने साखर कारखान्यांची गाळप क्षमता वाढली आणि आतापर्यंत ९२२.४३ लाख मे.टन ऊसाचे गाळप झाले आहे. १०३९.२३ लाख क्विंटल साखर तयार झाली आणि साखरेचा उतारा ११.२७ टक्के इतका आहे. गेल्या वर्षी याच कालावधीपर्यंत एकूण १५७ कारखान्यांनी केवळ ६७४.२७ लाख मे.टन ऊसाचे गाळप करून ७६८.३७ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले होते. उतारा ११.४० टक्के होता.
साखरेचे उत्पादन वाढले असले तरी, आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर मोठय़ा प्रमाणावर घसरल्याने राज्यातील साखर कारखानदारी गर्तेतच आहे. साखरेचा वाढलेला उत्पादन खर्च आणि त्या तुलनेत न मिळणारा दर ही कारखान्यांसमोरील मोठी डोकेदुखी ठरली आहे. यंदाच्या गळीत हंगामात १० कोटी मे.टन ऊसाचे गाळप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या जानेवारीत  ऊसाचा खरेदी कर माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्यामुळे साखर कारखान्यांना काहीसा दिलासा मिळाला खरा, पण अजूनही संकट पूर्णपणे दूर झालेले नाही. राज्यातील कारखान्यांनी शेतकऱ्यांना दिलेल्या ऊसाच्या किमतीवरून ऊस खरेदी कर आकारण्यात येतो. ही आकारणी महाराष्ट्र ऊस खरेदी कर अधिनियम-१९६२ च्या तरतुदीनुसार केली जाते. हा खरेदी कर चालू हंगामासाठी माफ करण्यात यावा, असा प्रस्ताव सहकार विभागानेच सादर केला होता.
या हंगामात सर्वाधिक ३७९.८४ लाख मे.टन ऊसाचे गाळप पुणे विभागातील ६० कारखान्यांनी केले आहे, तर सर्वात तळाशी अमरावती विभाग आहे. या विभागात केवळ दोनच कारखान्यांनी यंदा हंगाम घेतला आणि ४.८६ लाख मे.टन ऊसाचे गाळप झाले. नागपूर विभागातही चार कारखान्यांनी केवळ ५.४६ लाख मे.टन ऊस गाळप केले. उताऱ्याच्या बाबतीत मात्र कोल्हापूर विभाग आघाडीवर असून या विभागातील एकूण ३७ कारखान्यांनी १२.५४ टक्के उतारा मिळवला आहे. गेल्या दशकभरातील उपलब्ध नोंदीनुसार ऊस गाळप आणि साखर उत्पादनाचा यंदा उच्चांक नोंदवला गेला आहे. २००७-०८ मध्ये ७ कोटी ६१ लाख मे.टन ऊसाचे गाळप झाले होते, पण २००८-०९ मध्ये ऊस टंचाईमुळे केवळ ४ कोटी मे.टन ऊस गाळप होऊ शकले. त्यानंतर आतापर्यंत साखर कारखान्यांची झेप ८ कोटी मे. टनाच्या पलीकडे गेली नव्हती. देशातील एकूण साखर कारखान्यांपैकी ३१ टक्के कारखाने राज्यातच असून त्या खालोखाल २३ टक्के कारखाने उत्तर प्रदेशात आहेत. मार्च २०१४ अखेर देशातील एकूण गाळप झालेल्या साखरेच्या उत्पादनात राज्याचा हिस्सा ३२ टक्के होता. यंदा तो वाढण्याची चिन्हे आहेत.