औरंगाबाद : नागपूरप्रमाणेच औरंगाबाद आणि नाशिकमध्ये लवकरच कमांडिग नियंत्रण कक्ष उभे केले जातील. नागपूरमधील शुक्रवारी झालेल्या पावसानंतर या नियंत्रण कक्षाचा चांगला उपयोग झाला असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. त्याच धर्तीवर औरंगाबाद आणि नाशिकमध्ये सोय उपलब्ध करून दिली जाणार आहे. २२.२७ लाख रुपये खर्चून औरंगाबाद शहर पोलीस आयुक्तालयाच्या तीन मजली नव्या इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले.

शहर पोलीस आयुक्तालयात नवीन तंत्रज्ञानाच्या आधारे देण्यात आलेल्या सुविधांमुळे पोलिसांना काम करणे अधिक सुकर होईल, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी डिजिटायझेशनमुळे पोलीस यंत्रणेत गतिमानता येत असल्याचा दावा त्यांनी केला.

काही वर्षांपूर्वी दाखल प्रकरणात शिक्षेचा दर केवळ आठ ते दहा टक्के एवढा होता. तपास यंत्रणांनी स्वीकारलेल्या तंत्रज्ञानातील बदलामुळे हा दर आता ५५ टक्क्य़ांपर्यंत गेला आहे. सामान्य नागरिकांना ऑनलाइन पद्धतीने तक्रार नोंदवता येते. त्यामुळे तक्रार स्वीकारली नाही किंवा तक्रार आलीच नाही, असे म्हणण्याचा वाव कमी झाला आहे. अत्याधुनिक नियंत्रण कक्षामुळे कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती राखण्यास मदत होईल, असे ते म्हणाले.

या वेळी पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर, गृहनिर्माण विभागाचे पोलीस महासंचालक बिपीन बिहारी, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते. पोलीस आयुक्तालयातील इमारतीत सायबर क्राइम सेल, गुन्हे शाखेसाठी स्वतंत्र लॉकअप, सोशल मीडिया कक्ष, बैठक व्यवस्था आदी सोयी असून सौर ऊर्जा आणि कमी तापमान राहील, अशी अत्याधुनिक इमारत उभारण्यात आली आहे.