मान्सूनची चाहूल लागताच समुद्राने रौद्र रूप धारण केले आहे. समुद्र किनाऱ्यावर महाकाय सागरी लाटांनी रायगडच्या समुद्र किनाऱ्याला अक्षरश: झोडपून काढले आहे.
कोकण किनारपट्टीवर सलग सहा दिवस मोठे उधाण येणार असल्याचा इशारा प्रादेशिक हवामान विभागाकडून यापूर्वीच दिला होता. अपेक्षेप्रमाणे शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास भरतीला सुरुवात झाली. दुपारी १२च्या सुमारास साडेचार ते पावणे पाच मीटरच्या महाकाय लाटा समुद्र किनाऱ्यावर दाखल होण्यास सुरुवात झाली. दुपारी दीडपर्यंत लाटांचा जोर कायम होता. त्यामुळे किनारपट्टीवरील सखल भाग काही ठिकाणी जलमय झाला होता. त्यानंतर मात्र ओहोटीला सुरुवात झाल्याने लाटांचा जोर कमी झाला.   
    सागरी लाटांचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी अलिबाग, मुरुड, नागाव, आक्षी आणि वरसोली आणि मांडवा समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. उत्साही पर्यटकांना आवर घालण्यासाठी अलिबाग समुद्र किनाऱ्यावर जीवरक्षक तनात करण्यात आले होते. आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष उपाययोजना केल्या होत्या.
    दरम्यान समुद्रकिनाऱ्यावर ताशी ५० ते ५५ किमी वेगाचे वारे वाहत असल्याने आणखी दोन ते तीन दिवस समुद्र खवळलेला राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मच्छीमारांना मासेमारी करण्यासाठी खोल समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. येत्या बुधवापर्यंत समुद्राला साडेचार ते पाच मीटरची उधाण येणार आहे. त्यामुळे पर्यटकांनी समुद्रात पोहण्यासाठी उतरू नये, अशा सूचना जिल्हा प्रशासनाने केल्या आहेत.