काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्याची घोषणा केली होती. तर दुसरीकडे अभाविपकडून मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाचा विरोध होत आहे. अशातच भाजपा नेते आशिष शेलार यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन राज्य सरकारचा निर्णय विद्यार्थ्यांवर अन्याय करणारा असल्याचं म्हणत त्यांना एक निवेदनंही दिली. दरम्यान, एटीकेटी आणि बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता. “एटीकेटी आणि बॅकलॉगबाबत विद्यार्थ्यांच्या मनात शंका असल्या तरी त्याबाबत योग्य वेळी निर्णय घेतला जाईल आणि तो विद्यार्थ्यांच्या हिताचाच असेल,” असं स्पष्टीकरण उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिलं.

“महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या मनातील निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यापू्र्वीच घेतला आहे. त्या निर्णयानंतर एटीकेटी आणि बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांच्या संदर्भात संभ्रमाचं वातावरण निर्माण होत आहे किंवा काही जण ते जाणीवपूर्वक निर्माण करत असतील. ज्या पद्धतीनं इतर विद्यार्थ्यांसाठी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निर्णय घेतला आहे. तसाच योग्य निर्णय योग्य वेळी जाहीर केला जाईल,” असं सामंत म्हणाले. “यासंदर्भात कोणीही मनात शंका ठेवू नये, तसंच कोणत्याही संभ्रमावस्थेला आणि गैरसमजाला बळी पडू नका. यासदर्भातील चर्चा युद्धपातळीवर सुरू आहे,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.

काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. तसंच विद्यार्थ्यांना दोन पर्यायही देण्यात आले आहेत. पहिला पर्याय म्हणजे परीक्षा न घेता आतापर्यंतच्या सेमिस्टरच्या गुणांची सरासरी काढून श्रेणी देऊन विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येईल. तसंच ज्यांना हा पर्याय अन्यायकारक वाटत असेल त्यांनी करोनाचं संकट पाहता जेव्हा परीक्षा घेणं शक्य होईल, तेव्हा त्या विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार आहे.