श्रीरामपूर : नाफेडने कांदा खरेदी बंद केली, कर्नाटकातील लाल कांदा सुरू झाला. तशातच चाळीतील कांदा सडू लागल्याने आता तो विक्रीसाठी काढावा लागला. त्यामुळे आता कांद्याच्या दरात मोठी घसरण सुरू झाली असून सरासरी ८०० ते १००० रुपये क्विंटल दराने कांदा विकला जात आहे.

कांदा दरातील घसरण रोखण्याकरिता नाफेडमार्फत ५० हजार टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच निर्यातीकरिता अनुदानही देण्यात आले. निर्यातही सुरू आहे. त्यामुळे एक महिन्यापूर्वी दरात वाढ होऊन ते १३०० ते १५०० रुपयांवर गेले होते. दरवाढ सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांनी कमी किमतीत चाळीतील कांदा विक्रीला काढलेला नव्हता. त्यामुळे नाफेडच्या खरेदीलाही पुरेसा प्रतिसाद मिळाला नव्हता. नाफेडला कांदा खरेदी केल्यानंतर तो साठविण्यासाठी चाळी उपलब्ध झाल्या नाहीत. शेतकरी कंपन्यांनी सुरुवातीला कांदा खरेदी व्यवहारात स्वारस्य दाखविले होते. पण नंतर त्यांनी अंग काढून घेतले. त्यामुळे नाफेडची खरेदी बंद पडली आहे. आता नाफेडची खरेदी बंद होताच दरात घसरण सुरू झाली. ही घसरण पंधरा दिवसात सुमारे ५०० रुपयांनी झाली. आता कांद्याच्या दरात सुधारणा होईल, असे चित्र सध्यातरी दिसत नसल्याने शेतकऱ्यांनी नाइलाजाने कांदा विक्री सुरू केली आहे. नगर जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये सध्या विक्रमी आवक सुरू आहे. नगरला ६० हजार, राहुरी ५५ हजार, वांबोरी १५ हजार, घोडेगाव ६० हजार, राहाता ३० हजार, श्रीरामपूर ३० हजार गोण्यांची आवक लिलावाच्या दिवशी होत आहे. सध्या दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरियाना आदी  राज्यांतून मागणी असून  तेथील व्यापारी खरेदीसाठी आले आहेत. तरीदेखील बाजारावर जादा मालाचा दबाव असल्याने दरात वाढ झालेली नाही. आणखी मंदी येण्याची भीती व्यापारी व्यक्त करत आहेत.

कर्नाटक व आंध्र प्रदेशात नवीन कांद्याची आवक सुरू झाली आहे. ही आवक १५ ऑगस्टनंतर वाढेल. तसेच फलटण व लोणंद भागातील लाल कांदा १५ सप्टेंबरनंतर सुरू होईल. तसेच यंदा लाल कांद्याची विक्रमी लागवड झाली असून हा कांदा ऑक्टोबपर्यंत बाजारपेठेत येण्यास सुरुवात होईल. त्यामुळे आता चाळीत साठविलेला कांदा विक्रीला काढण्याशिवाय शेतकऱ्यांपुढे पर्याय राहिलेला नाही. चाळीतील साठवलेला कांदा हा सध्या तापमान वाढीमुळे खराब होण्यास प्रारंभ झाला आहे. मागील वर्षांच्या तुलनेत यंदा सुमारे ५० लाख टन कांदा चाळीत साठविण्यात आला होता. मागील वर्षांपेक्षा तो ५ लाख टन जास्त आहे. निर्यात सुरू असली तरी चाळीतील कांदा जास्त असल्याने दरात तेजीची शक्यता नाही. आता कांदा खराब होऊ  लागल्याने तो विक्रीसाठी काढावा लागत आहे. २०१५-१६ मध्ये खरीप व रब्बी कांद्याची लागवड ४ लाख ५७ हजार हेक्टरमध्ये झाली होती. तर उत्पादन ५७ लाख टन झाले. तर चालूवर्षी २०१७-१८ मध्ये ५ लाख २७ हजार हेक्टरवर लागवड होऊन उत्पादन ७२ लाख टन होण्याचा अंदाज होता. मात्र कृषी खात्याचा हा अंदाज चुकला असून उन्हाळी, रब्बी व खरीप कांदा मिळून उत्पादन ९० लाख टनावर पोहोचण्याचा अंदाज आहे. मागील वर्षीपेक्षा १५ ते २० लाख टन उत्पादन जास्त येण्याची शक्यता आहे. खरीप हंगामात लाल कांद्याची विक्रमी लागवड झाली आहे. कांद्याच्या उत्पादन वाढीचा अंदाज कृषी खात्याला आला नव्हता. त्यामुळे आता ऑक्टोबरनंतर कांद्याच्या दराचा गंभीर प्रश्न निर्माण होईल, अशी भीती तज्ञ व्यक्त करीत आहेत.

शेतकऱ्यांची कांदा साठवणुकीची क्षमता वाढली आहे. २०११ पूर्वी कांदा साठवणुकीची क्षमता केवळ ८ लाख मेट्रिक टन एवढी होती. मात्र आता ती २२ लाख मेट्रिक टनाच्या पुढे गेली आहे. कांदा चाळीसाठी सरकारने अनुदान दिल्याने तसेच साध्या चाळी निर्मितीचे तंत्रज्ञान आल्याने साठवणूक वाढली आहे. चाळीत नेमका किती कांदा आहे. याचा अंदाजच कृषी तसेच पणन विभागाल आलेला नाही. मात्र चाळीत ५० लाख टनापेक्षा अधिक कांदा साठविला गेला होता. त्यापैकी २० टक्के कांदा विकला असून अजूनही चाळीत कांदा शिल्लक आहे. आता हा कांदा अधिक काळ चाळीत टिकणे शक्य नाही. तो खराब व्हायला लागला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने कांदा विक्रीस काढला आहे.  सप्टेंबरनंतर तो एकदम बाजारात आला तर मात्र प्रश्न निर्माण होईल, असे कांदा व्यापाऱ्यांचे मत आहे.

नगर, पुणे, नाशिक व सोलापूर जिल्हय़ांत यंदा नाफेडने शेतकरी कंपन्यांमार्फत खरेदी सुरू केली होती. सुमारे २५ हजार टन कांदा खरेदी केला जाणार होता. मात्र चाळी उपलब्ध झाल्या नसल्याने खरेदी बंद करण्यात आली आहे. सुमारे १२ हजार टन खरेदी नाफेडने केली.

– बी.एम.पवार, व्यवस्थापक, नाफेड

कांद्याला निर्यात अनुदान जाहीर करून ते व्यापाऱ्यांना देण्यातही आले. त्यामुळे बाजारातील दर स्थिर आहेत. नाफेडनेही खरेदी सुरू केली होती. दरात घसरण होऊ  नये म्हणून प्रयत्न सुरू आहेत.

– पाशा पटेल, अध्यक्ष, राज्य शेतमाल आयोग